ज्वारीचे देशातील प्रमुख मार्केट म्हणून ओळख तयार झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या रब्बी हंगामातील नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. शनिवारी बार्शी बाजार समितीत विक्री झालेल्या ज्वारीला आजपर्यंतचा इतिहासातील सर्वाधिक ५१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
भूम तालुक्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या पाथरूड, आंबी शिवारातील रब्बी ज्वारीची काढणी जोरात सुरू झाली आहे. पात्रुड भागातील आनंदवाडी, नान्नजवाडी, सावरगाव आदी गावांमध्ये सध्या ज्वारी विक्रीसाठी तयार होऊ लागली आहे. यावर्षी रब्बी ज्वारीची पेरणी वेळेवर झाल्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नवीन ज्वारी विक्रीसाठी तयार होऊ लागली आहे.
तालुक्यातील पाथरूड, आंबी परिसरामधील शेतकऱ्यांची ज्वारी विक्रीस तयार होऊ लागली आहे. नेहमीच चांगल्या प्रतीची ज्वारी आणि ज्वारीचे कोठार म्हणून तालुक्यासह पाथरूड आंबी शिवाराची ओळख आहे.
यामुळे या भागातील ज्वारीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी मागणी असते. सध्या नवीन ज्वारीला प्रतिक्विंटल साडेतीन हजारांपासून ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले.
'या' शेतकऱ्याच्या ज्वारीने मिळवला सर्वाधिक दर
आनंदवाडी येथील शेतकरी नीलेश यादव खामकर यांच्या नवीन (सफेद गंगा) या पांढऱ्या शुभ्र उच्च प्रतीच्या ज्वारीला बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी यावर्षीचा सर्वाधिक ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. २० कट्टे ज्वारी आज त्यांनी विक्रीसाठी आणली होती.
ठिबक सिंचनद्वारे ज्वारीचे घेतले उत्पादन
शनिवारी भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील खामकर यांच्या ज्वारीला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. खामकर यांनी या ज्वारीला ठिबक सिंचनाने पाणी देत २१ क्विंटलचे उत्पादन मिळवले. गणेश भंडारी व संतोष होनराव या खरेदीदाराने ही ज्वारी खरेदी केली, तर विक्रीदार (आडते) वैभव तुळशीराम जुगदार हे होते.
शेतकऱ्याचा सत्कार
शनिवारी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी नीलेश यादव खामकर यांच्या उच्च प्रतीच्या ठिबक सिंचनवर घेतलेल्या ज्वारीला उच्चांकी सर्वाधिक ५ हजार शंभर रुपयांचा दर मिळाल्याने या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला.