सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. एरव्ही ५०० ट्रक आवक असताना शनिवारी मात्र २५० ट्रक आवक झाली.
आवक कमी असतानाही दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी मकरसंक्रांतीपूर्वी आणि नंतर सरासरी ७०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक होती.
यंदा डिसेंबरनंतर आवक वाढेल अशी आशा होती. मात्र, आवक वाढण्याऐवजी कमीकमी होत आहे. मकरसंक्रांतीच्या तीन दिवस सुट्टीनंतर आवक वाढेल, असा अंदाज होता.
मात्र, बुधवारी ९४ ट्रक, गुरुवारी ९२ ट्रक, शुक्रवारी १८५ ट्रक, शनिवारी २५० ट्रक आवक झाली. चार दिवसांमध्ये केवळ ६२१ ट्रक आवक झाली आहे. मागील वर्षी एका दिवसात एवढी आवक होती.
परतीच्या पावसावेळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांकडील कांदा संपला आहे. शिवाय एकरी उत्पादनही कमी निघत आहे. त्यात दर पडल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
उन्हाळी कांद्यावर भिस्त
यंदा पाऊस चांगला झाल्याने आणि उजनीतून आवर्तन वेळेत सोडल्यामुळे उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यात एकरुख योजनेला पाणी सोडल्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात लागवड वाढल्याने पुढील महिन्यापासून उन्हाळी कांदा मार्केटमध्ये येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.