Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड लिलाव शेतकऱ्यांच्या मुळावर; कांदा बाजारभाव थेट निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2023 12:37 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कांद्याचा दर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आवक वाढल्याचे सांगत एक दिवसाआड लिलाव करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कांद्याचा दर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आवक वाढल्याचे सांगत एक दिवसाआड लिलाव करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. या चुकीच्या निर्णयामुळे आणि निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने आठ दिवसांपूर्वी पाच हजारावर विकणारा कांदा आता दोन ते अडीच हजारांपर्यंत खाली आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षभर कांद्याची मोठी आवक असते. सरासरी पाचशे ट्रक कांद्याची आवक असल्यामुळे व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे. दरही चांगला भेटतो म्हणून पुणे, अहमदनगर, नाशिक या भागातील शेतकरीही सोलापुरात कांदा विकायला आणतात. मात्र, बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मागील आठ दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोलापूर बाजार समितीत सुमारे बाराशे ट्रक कांद्याची आवक झाली.

आवक वाढल्यामुळे लिलावानंतर कांदा भरून पाठविण्यासाठी वेळ लागतो. हमाल काम करत नाही असे सांगून दुसन्या दिवशी व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. पुन्हा तिसन्या दिवशी एक हजार ट्रक कांद्याची आवक झाली. तेव्हाही तीच परिस्थिती उद्भवली. मागील आठ-दहा दिवसांपासून बाजार समितीत एक दिवसाआड कांदा लिलाव सुरू आहे. त्याचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शनिवार, रविवार लिलाव बंदशुक्रवारी आवक वाढल्यामुळे शनिवारी कांदा लिलाव बंद आहे. रविवारी सुट्टी आहे. दोन दिवस बंद राहणार असल्याने पुन्हा सोमवारी मोठी आवक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुन्हा बंद ठेवण्याची वेळ घेऊ नये आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दुपारी दोननंतर लिलावाला सुरुवात- रात्री उशिरापर्यंत हमालांनी वाढीव पैशांसाठी माल न उतरविल्यामुळे शुक्रवारी दुपारीपर्यंत गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे सकाळी लिलावाला सुरुवात झालीच नाही.- दुपारी दोनपर्यंत गाड्याच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारी दोननंतर लिलावाला सुरुवात झाली. लिलाव सुरु झाल्यानंतरही आणखी गाड्या खाली करण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे गाडी मालकांना दोन दिवसांचे भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे.

सभापती आज घेणार बैठकसभापती आमदार विजयकुमार देशमुख सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहेत. शनिवारी सोलापुरात आल्यानंतर दुपारी कांदा व्यापारी व हमाल वर्गाची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात आले. येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवल्यास आणि कर्मचारी वाढविल्यास कॉडी सुटणार असल्याचे सांगण्यात आले.

- कांदा लिलाव एक दिवस बंद ठेवल्याने दुसऱ्या दिवशी दोन दिवसांचा माल मार्केट कमिटीत येतो. एका दिवसाला पाचशे ट्रक आल्यानंतर वर्षभरात लिलावात कधीच अडचण येत नाही.- केवळ लिलाव बंद ठेवल्यामुळे दोन दिवसांतील एक हजार गाड्या कांदा आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे.

कांद्याची आवकच वाढल्याने यार्डातील माल बाहेर काढण्यासाठी एक दिवस लागत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव लिलाव बंद ठेवण्याची वेळ येत आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्याच बाजूने आहेत. - केदार उंबरजे, व्यापारी संचालक, बाजार समिती

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतकरीपुणेनाशिक