नावीन्यपूर्ण पीक असलेल्या चियाच्या दरात मागील काही दिवसांत मोठी घसरण झाली होती. आता मात्र चियाच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली असून, चियाचे दर १६ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ जुलै रोजी चियाला कमाल १६,२५० रुपये प्रति क्विंटलपर्यतचा दर मिळाला.
वाशिम जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून नावीन्यपूर्ण पीक असलेल्या चियाची लागवड दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये नावीन्यपूर्ण चियाची केवळ १६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. तथापि, त्या वर्षी शेतकऱ्यांचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाल्याने इतर शेतकऱ्यांनीही हे पीक स्वीकारले.
परिणामी, २०२४-२५ मध्ये या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र तब्बल ३,६०८ हेक्टरवर पोहोचले. वाशिम बाजार समितीने या पिकाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि मुहूर्ताच्या खरेदीतच चियाला २५,००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. त्यानंतर हळूहळू चियाच्या दरात घसरण होत गेली.
चियाचे दर एप्रिल महिन्यात थेट १२,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यानंतर मात्र चियाच्या दरात सुधारणा होऊ लागत आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी चियाला तब्बल १६,२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळाला आहे.
पंधरा दिवसात असे वाढले दर
दिनांक | कमाल दर |
२१ जून | १४६०० |
२८ जून | १५६८० |
०५ जुलै | १६२५० |
आवक मात्र स्थिर
चियाच्या दरात वाढ होत असली तरी बाजार समितीत या शेतमालाची आवक मात्र स्थिरच असल्याचे मागील दोन आठवड्यांतील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
२८ जून रोजी वाशिम बाजार समितीत ३५० क्विंटल चिया आवक झाली होती, तर ५ जुलै रोजी दर वाढल्यानंतरही चियाची आवक केवळ ४५० क्विंटलवरच होती.
पंधरा दिवसांत दीड हजार रुपयांची वाढ
मे महिन्यापासून चियाच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. २१ जून रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला कमाल १४,६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता. तर शनिवार, ५ जुलै रोजी याच बाजार समितीत चियाला कमाल १६,२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. अर्थात, १५ दिवसांत चियाच्या दरात अडीच हजार रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.