बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर कमी आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाच्या दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भात उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. ग्रामीण भागात घरचा तांदूळ वापरला जात असला तरी शहरात मात्र बाजारी तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आहे. 'वाडा कोलम'ची ग्राहकांना पसंती आहे.
यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे भात कापणीला विलंब झाला. त्यात तयार पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादकता खालावली आहे. ग्रामीण भागात आजही घरचा तांदूळ वापरला जातो.
शहरवासीयांना मात्र बारीक, सुवासिक तांदळाची भुरळ आहे. त्यामुळे वाडाकोलम, आंबेमोहर, इंद्रायणी, जिरेसाल, ऐश्वर्या कोलम हा तांदूळ खरेदी केला जातो. सर्वाधिक पसंती मात्र 'वाडा कोलम 'साठी आहे.
नियमित खाण्यासाठी तुकडा तांदूळ, तर सणवार किंवा समारंभासाठी बारीक तांदूळ निवडला जातो. तांदळाच्या किमतीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तुकडा तांदूळ ४५ ते ५०, तर अखंड तांदूळ ६९ ते ११० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. तांदूळ प्रकाराप्रमाणे दरही भिन्न आहेत.
तांदळाचे भाव काय ?
प्रकार | जानेवारी २०२४ | जानेवारी २०२५ |
आंबेमोहर | ९८ | १०७ |
वाडा कोलम | ७८ | ९० |
इंद्रायणी | ५८ | ६९ |
ऐश्वर्या कोलम | ८८ | १०० |
भाव आणखी वाढणार
खरीप हंगामात पावसाचे प्रमाण चांगले होते, पीक चांगले आले. परंतु, ऐन कापणीच्यावेळी पावसाने झोडपल्यामुळे पिकाची उत्पादकता खालावली. त्यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली असून, अजून दर वाढणार असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
'नवीन तांदूळ बाजारात आला असून, जुन्या तांदळापेक्षा दर कमी आहेत. परंतु, नवीन तांदळापेक्षा जुन्या तांदळाला मागणी आहे. दरवाढीमुळे ग्राहकसुद्धा विचारपूर्वक खरेदी करतात. नियमित खाण्यासाठी कमी दर असलेला तांदूळ ग्राहक निवडत आहेत. - प्रथमेश गांगण, व्यापारी.
आवड 'वाडा कोलम'ची
'वाडा कोलम' तांदूळ बारीक असल्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांकडून खरेदीसाठी वाढती पसंती आहे. जुना वाडा कोलम २० रुपये, तर नवा ६८ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. नवीन तांदूळ खरेदी करून ग्राहक साठा करून ठेवत आहेत. चार-पाच महिन्यांनंतरच हा तांदूळ खाण्यासाठी वापरला जातो.
दरवाढीचा फटका
लग्नसराईचे दिवस असल्याने तांदळाला वाढती मागणी आहे. मात्र, दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. बहुतांश तांदळाचे दर हे शंभरीच्या पटीतील आहेत. त्यामुळे ग्राहक विचार करून खरेदी करत आहेत. दर पाहून निवड करीत आहेत.
जिल्ह्यात भात उत्पादन घेण्यात येत असले तरी ग्राहकांना बारीक, सुवासिक तांदूळ आवडतो. उत्पादकता खालावल्याने आवक मंदावली असून, दरवाढीचा फटका बसला आहे. लग्नसराईमुळे तांदूळ खरेदी सुरू असली तरी दर पाहून पसंती केली जात आहे. - ऋषिकेश शेट्ये, व्यापारी.
हेही वाचा : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी