सांगली : तुरीच्या पिकाने यंदा शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले भाव मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण आहे.
सध्या तुरीचा दर क्विंटलला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत स्थिर आहे. जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तुरीला क्विंटलला ९ हजार ते ८ हजार ५०० इतका दर मिळाला होता.
जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही भागांतील शेतकरीवर्ग तुरीचे पीक घेतो. जिल्ह्यात जत ही एकमेव तुरीची बाजारपेठ आहे. जत तालुक्यातील वळसंग, मुचंडी, दरिबडची, तिकोंडी, गुगवाड, सिंदूर या भागात तुरीच्या पिंक जातीचे पीक घेतले जाते.
तर जतच्या बाजारपेठेतकर्नाटकातील कोट्टलगी, कलमडी, चकमरी (ता. अथणी, जि. बेळगाव) या सीमाभागातून तुरीचे पीक मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी येत असते.
जतसह जिल्ह्याच्या शेजारी सोलापूर, बार्शी व कर्नाटकातील चडचण व लोणी येथे तुरीची चांगली बाजारपेठ आहे. या सर्व बाजारात सध्या तुरीच्या पिकाला चांगला भाव मिळत आहे. तुरीला बाजारात समाधानकारक भाव मिळाल्यामुळे शेतकरीवर्ग मात्र, आनंदात आहे.
कर्नाटक सरकारचा एमएसपीहून अधिक दर
◼️ सध्या तुरीच्या पिकाचा क्विंटलला एमएसपी दर ८ हजार इतका आहे तर कर्नाटक सरकारने एमएसपी अधिक ५०० रुपये बोनस असा दर देऊन तेथील शेतकऱ्यांचा माल खरेदी केला आहे.
◼️ त्यामुळे तुरीचा भाव चांगला वधारला आहे. त्यामुळे सीमाभागातील जतच्या तुरीच्या मार्केटमध्येही तुरीला ८ हजार ५०० ते ८ हजार इतका दर मिळत आहे.
भावामध्ये सातत्याने बदल
◼️ फेब्रुवारीच्या या आठवड्यात पिंक तुरीला क्विंटलला ८ हजार ते ८ हजार ५०० चा दर मिळत आहे.
◼️ मागील जानेवारी महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात क्विंटलला ७५०० ते ७८०० दर तर जानेवारी शेवटच्या आठवड्यात २१ ते ३० दरम्यान तुरीला ९ हजार ते ८५०० दर मिळाला.
◼️ मारुती वाणाच्या तुरीला क्विंटलला ७५०० ते ७८०० दर आहे. जानेवारीत ७२०० दर होता.
भाव वाढणार की पडणार?
◼️ सध्या तुरीच्या भावात चढ-उतार असला तरी गतवर्षीच्या तुलनेत चांगला भाव मिळत आहे.
◼️ गत वर्षी तुरीला क्विंटलला ६ ते ७ हजार इतकाच दर होता.
◼️ हा दर चांगल्या दर्जाच्या मालासाठी स्थिर राहील, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
◼️ त्यामुळे एमएसपी दराच्या आसपासच चांगला भाव तुरीचा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीला चांगला भाव आहे. कर्नाटक सरकारच्या खरेदीमुळे दरवाढीला चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये चांगली आवक होत आहे. हा दर असाच स्थिर राहू शकतो. - विशाल जालवादी, तुरीचे व्यापारी, जत
सध्या तुरीला चांगला दर आहे. मागील वर्षी योग्य भावा मिळाला नव्हता. मी ८ जानेवारी दरम्यान ७५०० रुपये क्विंटलने पीक बाजारात विकले. त्यानंतर जानेवारीच्या शेवटी २ हजार क्विंटलपर्यंत दर गेला होता. - गणेश चौगुले, शेतकरी, जत
अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर
