तासगाव : दिवाळीनंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौदे जोरात सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी १४,६५८ बॉक्स म्हणजेच सुमारे २२० टन बेदाण्याची आवक झाली.
विशेष म्हणजे या सौद्यांमध्ये सर्व प्रकारच्या बेदाण्यांच्या दरात प्रति किलो १५ ते २० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. बेदाणा दराने उसळी घेतली आहे.
सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनचे सभासद व्यापारी, बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, व्यापारी प्रतिनिधी संचालक सुदाम माळी, संचालक कुमार शेटे यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीनंतर गुरुवारपासून बेदाणा सौदे सुरू केले.
बैठकीत दिवाळीपूर्वी झालेल्या सर्व सौद्यांचे पेमेंट पूर्ण झीरो झाल्याची खात्री करूनच नवीन सौद्यांना परवानगी देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पेमेंट कालावधी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
ज्या खरेदीदारांचे पेमेंट ४० ते ४५ दिवसांच्या आत होत नाही, त्यांना पुढील सौद्यांत सहभागी होता येणार नाही, अशी अट ठेवण्यात आली.
सौदे आणि विक्री
विक्री - १५३ टन
आवक - २२० टन
प्रतवारीनुसार दर
हिरवा बेदाणा : ३३० ते रु. ४१५ प्रति किलो
पिवळा बेदाणा : ३२० ते रु. ३९५ प्रति किलो
काळा बेदाणा : ६० ते रु. २३५ प्रति किलो
सभापती युवराज पाटील व प्रभारी सचिव रवींद्र माने यांनी सर्व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आपला बेदाणा तासगाव बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले.
अधिक वाचा: चालू गळीत हंगामात 'ह्या' साखर कारखान्याने उसाला दिला राज्यात सर्वाधिक दर
