सांगली : बेदाण्याची आवक कमी झाल्यामुळे दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. बेदाणा सौद्यामध्ये किलोला उच्चांकी ४२५ रुपये दर मिळाला आहे.
सध्या शिल्लक बेदाणा कमी आणि द्राक्ष हंगामही अडचणीत असल्यामुळे बेदाण्याचे दर तेजीत राहातील, असा बेदाणा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
दिवाळीनंतर सांगलीत झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये तेरा दुकानांमध्ये ११ हजार बॉक्सची आवक झाली होती. प्रतिकिलो ४२५ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.
त्यामुळे सुरुवातीच्या सौद्यातच २५ ते ३० रुपये बाजारभाव वाढल्याने शेतकरी समाधानी आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीत बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आव्हान महेश चव्हाण यांनी केले आहे.
यावेळी कृष्णकुमार सारडा, विनायक हिंगमिरे, पवन चौगुले, सुनील हडदरे, विनोद गड्डे, अभिजीत पाटील, दिगंबर यादव, कृष्णा मर्दा, सिद्धार्थ पटेल, नितीन मर्दा, पंकज केसरी, वृषभ शेडबाळे, सचिन चौगुले, धनंजय पाटील यांसह व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहा व्यापाऱ्यांवर बेदाणा सौद्यात बंदी
◼️ दिवाळी सुटीमुळे आणि शून्य पेमेंटसाठी सांगली, तासगाव, पंढरपूर बाजारातील सौदे बंद ठेवण्यात आले होते.
◼️ चालू वर्षी बेदाण्याचे भाव वाढल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे येणे-देणे शिल्लक होते.
◼️ पण बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंटची काटेकोर अंमलबजावणी केल्याने १० व्यापाऱ्यांवरच बेदाणा सौद्यात बंदी घालण्यात आली आहे, असे बेदाणा असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
असे आहेत दर (प्रतिकिलो दर)
◼️ पिवळा बेदाणा - ३०० ते ३९० रुपये.
◼️ हिरवा बेदाणा - ३६० ते ४२५ रुपये.
◼️ मध्यम दर्जा हिरवा - २५० ते ३५० रुपये.
◼️ काळा बेदाणा - १४० ते १६० रुपये.
अधिक वाचा: राष्ट्रीय बाजार स्थापनेचा अध्यादेश जारी; पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' आठ बाजार समित्यांचा समावेश
