संजय लव्हाडे
जालना बाजारात ज्वारीपेक्षा कडबा महाग झाला असून, सरकी ढेप किंचित महाग झाली आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना जादा दराने कडबा विकत घ्यावा लागत आहे. लग्नसराईच्या दिवसांत सोने, चांदी स्वस्त झाली आहे. बाजरी, मका, तूर आणि खाद्यतेलाच्या दरात मंदी आली, मात्र करडी तेलाचे दर स्थिर आहेत.
ग्रामीण भागात ज्वारीपेक्षा कडब्याला दुप्पट भाव मिळत आहे. चाराटंचाईमुळे यंदा कडब्याची पेंढी २० ते २५ रुपयांना विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर चालतो.
तसेच शेतीसाठी बैलजोडी आवश्यक असते; परंतु गेल्या काही वर्षांपासून जनावरांसाठी महत्त्वाचा चारा असलेल्या ज्वारीचा पेरा घटला आहे. यंदा ज्वारीच्या पेरणीत घट झाली आहे. काही ठिकाणी प्राण्यांच्या उपद्रवामुळे चाराटंचाईचे नवे संकट निर्माण झाले आहे.
कापसाच्या दरात तेजी
सरकीचे दर बाजारात ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल असे होते. आता त्यात वाढ होत ३७०० रुपये क्विंटलने सरकीचे व्यवहार होत आहेत. परिणामी कापूस दर तेजीत आले, त्याबरोबरच सरकी ढेपदेखील महागली. सरकीचा वापर तेलासाठी होतो. त्याबरोबरच प्रक्रियेदरम्यान ढेप मिळते. या पदार्थाचा वापर आहार आणि पशुआहारात होतो. या बाजारातील तेजीच्या परिणामी कापसाचे दर तेजीत आले आहेत.
बाजारभाव
गहू - २३५० ते ५०००
ज्वारी - २००० ते ३८००
बाजरी - २४०० ते २७००
मका - १४०० ते २१००
तूर - ६५०० ते ७१००
हरभरा - ५४०० ते ५५००
काबुली चना - ५६०० ते ८५००
उडीद - ७१००
सोयाबीन - ३६०० ते ४४५०
गूळ - ३६०० ते ४३००
पामतेल - १३१००
सूर्यफूल तेल - १४६००
सरकी तेल - १३५००
सोयाबीन तेल - १३३००
करडी तेल - २९०००
सोन्याच्या दरात घसरण
• यंदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठत तब्बल एक लाख रुपये प्रती तोळ्याचा टप्पा पार केला होता. मात्र, आता या झपाट्याने वाढलेल्या दरात तब्बल १० टक्क्यांची घसरण झाली असून, ९३ हजारांपर्यंत भाव खाली आले आहेत. चांदीचे दर ९५ हजार रुपये प्रती किलो असे आहेत.
• भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यानंतर ग्राहकांना सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतील रस कमी झाला. बऱ्याच जणांनी गुंतवणुकीसाठी इतर पर्याय निवडले. काहीजण शेअर बाजाराकडे वळले. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा