थंडीची चाहूल लागली की, तरुणांना खुणावते ती हुरड्याची पार्टी. या काळात हुरड्याची आवक सुरू होत असल्याने ग्रामीण भागासह शहरानजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात हुरड्याची मागणी वाढते.
मात्र, यावर्षी एकीकडे थंडीचा मोसम सुरू होतानाच पावसाचा फटका हुरड्याला बसला. रत्नागिरी जिल्ह्यात हुरडा बनवण्यासाठी लागणारे ज्वारीचे पीक घेतले जात नसल्याने हा हुरडा दुसऱ्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येतो. मात्र, त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.
ज्वारीच्या कोवळ्या हिरव्या दाण्यांना 'हुरडा' म्हणतात. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात हुरड्याचा हंगाम सुरू होतो. थंडी संपेपर्यत हुरड्याला मागणी असते. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक कमी होते.
परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे हुरड्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी, आवक कमी आणि मागणी वाढल्याने हुरड्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
थंडी पडल्यानंतर हुरड्याची मागणी वाढते. महामार्गालगत, पर्यटनस्थळी, फार्म हाऊसवर हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. विशेषतः तरुणांमध्ये या पार्टीचे आयोजन करण्याचे प्रमाण अधिक आहे.
अलीकडे घरगुती पार्टीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांकडून हुरड्याची खरेदी वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हुरडा पार्टीचे प्रमाण अत्यल्प आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 'पोपटी'ची क्रेझ
रत्नागिरी जिल्ह्यात ज्वारीचे पीक घेतले जात नसल्याने हुरडा कमी लोक बनवतात. मात्र, पोपटीसाठी लागणाऱ्या वालीच्या शेंगा तसेच शाकाहारी व मांसाहारी साहित्य मिळत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात थंडीच्या दिवसात हुरडा पार्टीपेक्षा पोपटी बनवण्यास जास्त पसंती दिली जाते. त्यामुळे हिवाळ्यात जिल्ह्यात पोपटी पाट्याचे आयोजन केले जाते.
रेडिमेड हुरडा
गेल्या काही वर्षापासून हुरड्याची तयार पाकिटे विक्रीसाठी येत आहेत. एका पाकिटात एक किलो हुरडा असतो. सुरती आणि गुळभेंडी अशा प्रकारात हुरडा उपलब्ध असतो. सध्या बाजारात सुरती हुरड्याची आवक व्हायला सुरुवात झाली असून, त्याला पारंपरिक चव असते.
