बटाट्याचे उत्पादन वाढले आणि मागणी स्थिरावल्याने सध्या बाजारात दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत बटाटा खाली आला आहे. त्यात युद्धामुळे निर्यातीवरही काहीसा परिणाम दिसत असून, त्यामुळे दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बटाट्याचे उत्पादन होत नाही. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत 'इंदोर', 'आग्रा', 'गुजरात' येथून मोठ्या प्रमाणात बटाटा रोज येतो. दरदाम चांगला असल्याने येथे आवक चांगली होते. येथून खरेदी करून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवासह कोकणात बटाटा जातो. त्यामुळे येथे रोजची उलाढाल खूप मोठी आहे.
मात्र, यंदा सगळीकडेच बटाट्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यात, युद्धामुळे निर्यातीवर थोडा परिणाम झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत बटाट्याचे दर कोसळले आहेत. कोल्हापूर बाजार समितीत रोज सरासरी २५ गाड्यांची आवक होते. दर १० ते १४ रुपये किलोपर्यंत राहिला आहे.
किरकोळ बाजारात जास्तीत जास्त २० रुपये किलोपर्यंत दर आहे. पावसाळ्याची बेगमी म्हणून उन्हाळ्यात बटाट्याचे चिप्स मोठ्या प्रमाणात करून ठेवले जातात. दरम्यान, कांद्याची आवक आणि उठाव यात मोठी तफावत असल्याने दर कमी आहेत. सध्या घाऊक बाजारात ५ ते १२ रुपये किलो कांदा आहे. चांगल्या प्रतीचा कांदा १२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे.
गॅसटंचाईचाही फटका
गॅसटंचाईमुळे हॉटेलमधील पदार्थावर मर्यादा आल्या आहेत. त्यात, समारंभही कमी झाले किंवा त्याची व्याप्ती कमी केल्याने जेवणावळी काहीसा थांबल्या आहेत. त्याचाही फटका बटाट्याला बसला आहे.
कांदा, बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आणि उठाव नसल्याने दर घसरले आहेत. त्यात युद्धाचा फटकाही काही प्रमाणात बसत आहे. - उदय देसाई, कांदा-बटाटा व्यापारी, कोल्हापूर.
बाजार समितीमधील कांदा-बटाट्याची आवक व दरदाम
| माल | आवक | किमान दर | कमाल दर |
| कांदा | ८० ते १०० गाड्या | ५ | १२ |
| बटाटा | १५ ते २५ गाड्या | १० | १४ |
हेही वाचा : विजयरावांनी घेतले तीन एकरात हरभऱ्याचे ४१ क्विंटल उत्पादन; १.४५ लाखांचा मिळवला नफा
