राहुल पेटकर
रामटेक : राज्य सरकारच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत रामटेक तालुक्यात पणन मंडळ (Marketing Board)आणि आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
या केंद्रांवर नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धानाची एमएसपी दराने मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी (Paddy procurement) सुरू आहे. दुसरीकडे, चुकारे देण्यात कमालीचा संथपणा असल्याने धान उत्पादकांची (Paddy grower) आर्थिक कोंडी झाली आहे.
पणन मंडळाने नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात ११ केंद्र, रामटेकमध्ये ४, भिवापूर, पारशिवनी व कुहीमध्ये प्रत्येकी दोन तर उमरेड व कामठी तालुक्यात प्रत्येकी १ असे एकूण २३ धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत.
आदिवासी विकास महामंडळाचे (Tribal Development Corporation) रामटेक तालुक्यातील पवनी व डोंगरी येथे धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या सर्व केंद्रांवर नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून एमएसपी म्हणजे २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने धानाची खरेदी केली जात आहे.
६२,९०५ क्विंटल धान खरेदी
* २१ जानेवारीपर्यंत पणन मंडळाने ४८,९०९.२५ क्विंटल तर १९ जानेवारीपर्यंत आदिवासी विकास महामंडळाने १३,९९६.६० क्विंटल असे एकूण ६२,९०५.८६ क्विंटल धान खरेदी केले आहे. १,६२६ नोंदणीकृत शेतकऱ्यांनी पणन मंडळाला तर ३६२ शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला धानाची विक्री केली आहे.
बोनसचे आश्वासन
* धान खरेदीला डिसेंबर २०२४ पासून सुरुवात करण्यात आली. त्यातच सरकारने धान विक्री ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ दिली. सोबतच बोनस देण्याचे आश्वासन दिले.
* यावर्षी धानाचे उत्पादन व खुल्या बाजारात मिळणारा दर समाधानकारक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. धानाचे चुकारे खरेदीनंतर आठ दिवसात देण्याचे घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली होती.
* वास्तवात महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. कर्ज व उसणवार घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी पैशाची नितांत गरज असून, सरकार चुकारे देण्यास दिरंगाई करीत असल्याने आपल्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
१०.५३ कोटींचे चुकारे थकीत
शेतकऱ्यांनी एमएसपी दराने विकलेल्या धानाचे एकूण चुकारे ११ कोटी २४ लाख ९१ हजार २७५ रुपयांचे आहेत. पणन मंडळाने १०० शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे ७१ लाख ४८ हजार ३५४ रुपयांचे चुकारे दिले असून, १ हजार ५३६ शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाही.
त्यामुळे राज्य सरकारकडे १० कोटी ५३ हजार ४२ हजार २२१ रुपयांचे चुकारे थकीत आहेत. आदिवासी विकास महामंडळाने ३२१ शेतकऱ्यांना चुकारे दिले असून, त्यांच्याकडे ४८ शेतकऱ्यांचे चुकारे बाकी आहेत.
निधीअभावी चुकारे देण्याची प्रक्रिया मंदावली आहे. सरकारकडून निधी उपलब्ध झाला की, शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा केली जाते. शिल्लक शेतकऱ्यांचे चुकारे सुद्धर लवकरच जमा होईल. - सुखदेव कोल्हे, सहायक उपनिबंधक, रामटेक.
हे ही वाचा सविस्तर : Agro Advisory : ज्वारी, गहू पिकांसाठी सामान्य कृषी सल्ला वाचा सविस्तर