टाकळीभान उपबाजार आवारात जो आडतदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख पेमेंट देईल अशाच आडतदारांना कांदा खरेदी लिलाव बोलीत सहभागी होता येईल.
असा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला. याची अंमलबजावणी टाकळीभान उपबाजारात सुरु होताच १५ पैकी केवळ ९ अडते लिलावात सहभागी झाले.
टाकळीभान उपबाजारात परिसरातील २५ ते ३० गावांमधील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आणतात. आठवड्यातून ६ दिवस मोकळा कांदा व गोणी कांद्याचा लिलाव केला जातो.
कांद्याची जास्त आवक असल्याने या उपबाजारात १५ आडते कांदा खरेदी करण्यासाठी असतात. शेतकऱ्यांची काही अडत्यांकडून फसवणूक होण्याच्या घटना घडल्या.
अशा घटना टाळण्यासाठी श्रीरामपूर बाजार समीतीच्या संचालक मंडळाने रोख पट्टीचे धोरण स्वीकारले. याची अंमलबजावणी टाकळीभान उपबाजारात सुरू करण्यात आली.
१५ पैकी केवळ ९ सक्षम आडते कांदा खरेदी लिलावात सहभागी झाल्याचे दिसून आले. या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
ही बाजार समिती शेतकऱ्यांचे हित बघणारी संस्था आहे. व्यापारी या संस्थेचे मुख्य घटक आहेत. काही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे बुडवल्याची प्रकरणे समोर आली. सावधगिरी बाळगत शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळावेत याची दक्षता घेतली जात आहे. - मयूर पटारे, संचालक, बाजार समिती
बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबेल. - श्रीधर गाडे, कांदा उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त