शासकीय हमीभाव केंद्रावर (CCI) कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेल्या 'कपास किसान' ॲपवरील नोंदणीस सात दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ४ हजार कापूस उत्पादक शेतकरी अद्यापही नोंदणीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात खासगी व्यापारी कापसाची खरेदी ६,५०० ते ७,००० रुपये दराने करत आहेत.
याउलट शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर मध्यम धाग्यासाठी ७,७१० रुपये तर लांब धाग्यासाठी ८,११० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. वाहतुक खर्च वजा जाता, शासकीय केंद्रावर कापूस विकल्यास एका ट्रकमागे ८० हजार मिळतात.
गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीची सद्यस्थिती
एकूण अंदाजित कापूस उत्पादक शेतकरी - ६,०००
नोंदणी पूर्ण केलेले - १,७०२
अलॉटमेंट (कागदपत्रे अपलोड) झालेले - १,२१८
कागदपत्रे अपूर्ण - ५१६
प्रत्यक्ष कापूस विक्री केलेले - ५७२
नोंदणी न केलेले शेतकरी - अंदाजे ४,०००
ॲपवर नोंदणीस अडचणी आल्यास येथे करा संपर्क
ज्या शेतकऱ्यांना 'कपास किसान' ॲपवर नोंदणी करताना अडचणी येत आहेत, त्यांनी चामोर्शी, अहेरी व सिरोंचा कृउबासशी संपर्क साधावा. अनखोडा येथे 'आस्था जिनिंग' व 'प्रिन्स कॉटन जिनिंग' ही शासकीय केंद्र आहेत.
खासगी व्यापाऱ्यांच्या कमी दराला बळी पडू नका. कापूस हमीभाव केंद्रावरच विक्रीसाठी आणावा व आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा. ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी करावी. - अतुल गण्यारपवार, संचालक, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन.
