नाशिक : ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 'एनसीसीएफ' मार्फत कांदा खरेदीनंतर (NCCF Kanda Kharedi) वाहतूक आणि पुरवठा प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
ऑक्टोबरअखेर देशातील विविध बाजारपेठांपर्यंत कांदा (Kanda Market) पोहोचणे अपेक्षित होते; मात्र फक्त एकाच वाहतूक एजन्सीची निवड केल्याने पुरवठा वेळेत होत नसल्याने साठवलेला कांदा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जुलै महिन्यात एनसीसीएफकडून वाहतूक निविदा जाहीर करण्यात आली होती. याप्रक्रियेत पाच वाहतूक कंपन्या सहभागी झाल्या. सर्वांनी बँक हमी, करार आदी सादर केल्यानंतर पाचपैकी फक्त एका एजन्सीला काम देण्यात आले, तर उर्वरित चार कंपन्यांचे करार आणि हमीपत्रे अद्याप एनसीसीएफ कार्यालयातच पडून आहेत.
निवडलेल्या एजन्सीला निविदेतील दरापेक्षा तब्बल ६० ते ७० टक्के जास्त दराने स्थानिक वाहतुकीचे काम दिल्याचे आरोप होत आहेत. मागील दोन वर्षात एनसीसीएफने किमान चार ते पाच वाहतूकदारांकडून काम करून घेतले होते. मात्र यावर्षी फक्त एकाच वाहतूकदाराला सर्व काम देऊन कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराला आमंत्रण दिल्याचा आरोप होत आहे.
प्रक्रीया दिल्लीतूनच
दरम्यान, निविदा प्रक्रीयेबाबत नाशिकच्या शाखा व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता सदर निविदा प्रक्रीया ही दिल्ली येथून झाले असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक आणि पुरवठा प्रक्रिया विलंबाने होत असल्यामुळे हा साठवलेला कांदा गोदामातच पडून राहत आहे. त्यामुळे ओलसरपणा, कुजणे आणि वजन घटणे आदी कारणांमुळे कांद्याची गुणवत्ता कमी होत आहे.
