केडगाव : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातीलकांदा मार्केटमध्ये सोमवारी (दि. ८) झालेल्या लिलावात १ नंबर लाल कांद्याला प्रतिक्विंटल २१०० रुपये ते २५०० रुपयांचा तर काही गोण्यांना २६०० ते ३००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये ते २१०० रुपयांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांतील हा उच्चांकी भाव आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नेप्ती कांदा मार्केटमध्ये ८ डिसेंबर रोजी तब्बल ३५२ ट्रक कांद्याची आवक झाली होती. यामध्ये गावरान कांदा ६३ हजार ९९२ गोण्यांमध्ये ३५ हजार १९५ क्विंटल तर लाल कांदा ६ हजार ४९३ गोणीमध्ये ३५७१ क्विंटल विक्रीला आला होता.
यापैकी १ नंबर लाल कांद्याला २१०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर २ नंबर कांद्याला १५०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल, ३ नंबर कांद्याला ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल आणि ४ नंबर कांद्याला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
याशिवाय उच्च प्रतीच्या ६९ गोणी कांद्याला ३००० तर ८३ गोणीतील कांद्याला २६०० एवढा भाव मिळाला आहे.
६ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात लाल कांद्याला १५०० ते १८०० व गावरान कांद्याला १४०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू लागल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रतवारी करून कांदा विक्रीला आणावा
◼️ कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती मार्केटमध्ये विक्रीला आणावा.
◼️ तसेच गावरान कांद्याला ऊन व थंडीमुळे मोड येणे, काजळी पकडणे याचे प्रमाण वाढलेले आहे.
◼️ त्यामुळे कांद्याची पत्ती कमकुवत होऊन, गुणवत्ता कमी झालेली आहे.
◼️ असा माल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीसाठी स्वतः उपस्थित राहावे.
लाल कांदा चांगला वाळवून, सुकवून प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, सचिव अभय भिसे, सहसचिव संजय काळे यांनी केले आहे.
अधिक वाचा: शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन
