चाकण : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची विक्रमी आवक झाल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
जानेवारीपासून सुरू झालेली दरातील कपात अद्याप थांबलेली नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
वाढती आतक, देशांतर्गत मागणीतील घट आणि निर्यातीतील अडथळे यामुळे कांद्याचे दर कोसळले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा जोतीराव फुले उपबाजारात जानेवारी (दि. १८) ते फेब्रुवारी अखेरपर्यंत १ लाख ५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
जानेवारीत कांद्याला कमाल १,७०० रुपये, किमान १,२०० रुपये आणि सरासरी १,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता.
मात्र फेब्रुवारीअखेर हे दर घसरून कमाल १,५०० रुपये, किमान ९०० रुपये आणि सरासरी केवळ १,२०० रुपये इतके राहिले. दीड महिन्यात सरासरी दरात तब्बल ५०० रुपयांची घट झाली.
दीड महिन्यातील १,०५,००० क्विंटल आवक आणि प्रतिक्विंटल ५०० रुपयांची घसरण गृहीत धरल्यास शेतकऱ्यांचे सव्वा पाच कोटींचे नुकसान झाले.
उत्पादन खर्चही निघत नसल्याने क्विंटलमागे किमान १,००० रुपयांच्या अनुदानाची मागणी होत आहे.
निर्यात घटली, परदेशी स्पर्धा वाढली
◼️ दरात घसरण होण्यामागे परदेशी बाजारातील घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत.
◼️ बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांत भारतीय कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत होती.
◼️ मात्र बांगलादेशातील अस्थिर परिस्थिती व स्थानिक आवक वाढल्याने निर्यात परवान्यांवर मर्यादा आल्या.
◼️ श्रीलंकेने आयातीवर प्रतिकिलो ५० रुपयांचे शुल्क लावले असून, नेपाळमध्येही मागणी घटली आहे.
◼️ आखाती देशांत पाकिस्तान आणि चीनमधील स्वस्त कांदा उपलब्ध झाल्याने भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता कमी झाल्याची माहिती संचालक महेंद्र गोरे यांनी दिली.
तातडीच्या उपाययोजनांची गरज
◼️ कांद्याच्या दरातील घसरण ही केवळ बाजारातील चढ-उतार नसून हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हादरा देणारी ठरत आहे.
◼️ सरकारने हमीभाव, निर्यात प्रोत्साहन, साठवणुकीसाठी अनुदान आणि थेट आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
◼️ दरवर्षीचा दरातील चढ-उतार नवा विषय नसला तरी यंदाची घसरण शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने 'अश्रूचा कांदा' ठरत आहे.
अधिक वाचा: कर्नाटकच्या बोनस तूर खरेदीचा परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या दरात मोठी उसळी
