अहिल्यानगर : आवक वाराई तीन रुपये मिळावी, या मागणीवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे जिल्हा हमाल पंचायत संघटनेने बंद पुकारला आहे.
मध्यरात्रीपासून माथाडी कामगार काम बंद करणार आहेत, अशी माहिती जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितली.
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे शहरासह जिल्ह्यात कांदा खरेदी-विक्री गुरुवारपासून ठप्प होणार आहे. अहिल्यानगर माथाडी मंडळाने प्रति गोणी ३ रुपये आवक वाराई देण्याचा निर्णय घेतला आहे.
माथाडी मंडळाने निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शहरासह जिल्ह्यातील नेप्ती बाजार समिती, घोडेगाव, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, तिसगाव, अकोले, मिरजगाव, जामखेड, शेवगाव, कोपरगाव, पाथर्डी, पारनेर, वांबोरी, कर्जत, राहाता बाजार समित्यांना कळविले आहे.
परंतु, दरवाढ देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने जिल्हा हमाल पंचायत संघटनेने २० ऑगस्टपासून काम बंदचा इशारा दिला होता. याबाबत सहायक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक झाली.
परंतु, या बैठकीतही कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे कामगार आंदोलनावर ठाम आहेत. रात्री बारानंतर बाजार समितीत येणारा कांदा माथाडी कामगार उतरवून घेत असतात.
अधिक वाचा: राज्यातील धरणे ९० टक्के भरली; कोणत्या विभागात झाला किती पाणीसाठा?