सोपान भगत
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि. १) मागील पंधरवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक वाढली. लिलावात कांद्याच्या एक अर्ध्या वक्कलसाठी २२०० रुपये, तर सरासरी कांद्याला १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
शनिवारी (दि. १) बाजार समितीत एकूण ७५ हजार ६२३ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात एक नंबर कांद्यास २१०० ते २२०० रुपये, मुक्कल भारी १७०० ते १९००, गोल्टी ११०० ते १२००, गोल्टा १५०० ते १७००, तर जोड व कमी कलरच्या कांद्याला २०० ते ४०० रुपये भाव मिळाला.
दक्षिण भारतात कांद्याची मागणी वाढल्याने उन्हाळी कांद्याला मागील पंधरवड्यापेक्षा ४०० ते ५०० रुपये दरवाढ झाली आहे. कांद्याचे भाव वाढल्याने कांद्याची आवक वाढल्याचे दिसत आहे. - भाऊराव बन्हाटे, कांदा आडतदार, घोडेगाव.
दिवाळीनंतर गावरान कांद्याचे दर कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता; परंतु अतिवृष्टीमुळे लाल कांदा खराब झाला. त्यामुळे आता गावरान कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. - सुयश कलंत्री, कांदा आडतदार, घोडेगाव.
श्रीरामपुरात कांदा दोन हजार रुपये
श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा मार्केटमध्ये (दि.३१) ऑक्टोबरला १३६०० गावरान कांदा गोणीची आवक झाली. उच्च प्रतीच्या कांद्यास सर्वाधिक दोन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.
लिलावात प्रथम श्रेणीचा कांदा १५०० ते २०००, द्वितीय ११०० ते १३५०, तृतीय ७०० ते १०५०, गोल्टी १००० ते १४०० व खाद ३०० ते ६५० रुपये प्रती क्विंटल विकला. दीपावलीनंतर सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे कांद्याची गुणवत्ता कमी झाली. आवक वाढती असूनही भाव स्थिर राहिले आहेत.
बाजार समितीने मोकळा कांदा लिलाव काही महिन्यापूर्वी बंद केले आहेत. ते लिलाव पूर्ववत सुरू करावेत. या पद्धतीमुळे गोणी व मजुरीचा खर्च वाचून वेळ वाया जात नाही. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनास द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
