पुणे जिल्ह्याच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. १) शेतमाल विक्रीचा पहाटेचा बाजार सुरू करण्यात आला. बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांच्या हस्ते काटा पूजन करून या बाजाराचे उद्घाटन झाले. दररोज पहाटे ४ वाजता हा बाजार भरेल, असे जाहीर करण्यात आले असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फडतरे आणि संचालक मंडळाने केले आहे.
पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीची व्यवस्था व्हावी, अशी शेतकऱ्यांची दीर्घकाळापासून मागणी होती. यापूर्वी नीरा ग्रामपंचायतीद्वारे बाजार तळावर पहाटेचा बाजार भरत होता; परंतु तो बंद पडला. तसेच, पिंपरे (खुर्द) येथील खासगी घाऊक बाजारही बंद झाल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नव्हता.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भाजीपाला विक्रीसाठी ही स्वतंत्र बाजार सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. उद्घाटन प्रसंगी उपसभापती बाळासाहेब शिंदे, संचालक अशोक निगडे, विक्रम दगडे, राजाकुमार शहा, देविदास कामाथे, वामन कामाथे, बाळासाहेब जगदाळे, भाऊसाहेब गुलदगड, सुशांत कांबळे, पंकज निलाखे, व्यापारी दत्ता निंबाळकर, मोशीन बागवान आदी उपस्थित होते.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल विक्रीचा बाजार आजपासून सुरू झाला आहे. हा बाजार पहाटे भरणार असला, तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार त्याची वेळ ठरवली जाईल. - संदीप फडतरे, अध्यक्ष, नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती.