संजय लव्हाडे
जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकी चांगली असून गहू, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आणि सोने, चांदीच्या दरात तेजी आली आहे. नाफेडने सोयाबीन खरेदीची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवली असली तरी बारदाना नसल्याने खरेदी बंद आहे.
तुरीला तरी अपेक्षित भाव मिळेल या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दरात घसरणीमुळे शेतकऱ्यांपुढे पेच आहे. यंदा तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले होते. मात्र, आयात केलेल्या तुरीमुळे बाजारात आवक वाढली आहे.
यामुळे तुरीचे भाव घसरत आहेत. जिल्ह्यातही तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दहा दिवसांपूर्वी तुरीला ९००० ते ९५०० रुपये प्रतिक्विंटल एवढा चांगला दर मिळत होता. मात्र, आता हा दर १००० ते १५०० खाली आला आहे.
बाजारभाव
गहू | २७५० ते ४५०० |
ज्वारी | २१०० ते ३१०० |
बाजरी | २६०० ते ३१०० |
मका | १९०० ते २३७५ |
मूग | ६१०० |
हरभरा | ५५०० |
गूळ | २७०० ते ३५०० |
साखर | ३८०० ते ४००० |
पामतेल | १४७०० |
सूर्यफूल तेल | १४४०० |
सोयाबीन तेल | १३८०० |
करडी तेल | २१००० |
मुदत वाढवण्याची मागणी
• सोयाबीन खरेदीत अनेक अडचणी येत आहेत. बारदाना नसल्याने बहुतांशी केंद्रांवर खरेदी बंद आहे. सध्याची खरेदीची गती पाहता मुदतीत खरेदी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती.
• सध्याच्या गतीनुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी आणखी किमान २ महिन्यांची मुदत देण्याची मागणी खरेदी केंद्रांनी केली होती.
• सरकारने सोयाबीन खरेदीला १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे; मात्र खरेदी केंद्रावर बारदाने उपलब्ध नाहीत, शेतकऱ्यांना ओटीपी येत नाही अशा अनेक अडचणी आहेत.
गुंतवणूक वाढल्याने दर वधारले
१. नवीन वर्षात सोन्या, चांदीच्या दरांना पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याचे दर जवळपास ३८ टक्क्यांनी वाढले होते.
२. शेअर मार्केट सोडून लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. सोन्याचे दर ७९००० रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर ९३००० रुपये प्रतिकिलो असे आहेत.