कोल्हापूर : यंदा पावसाने खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, यातून फुलबागाही सुटलेल्या नाहीत. झेंडू फुलांचे नुकसान झाल्याने सध्या आवक काहीसी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या, झेंडूचा दर ८० रुपये किलो असला तरी खंडेनवमीला दीडशे रुपयांपर्यंत दर जाणार आहे. गलांड्यासह इतर फुलेही तेजीत आहेत.
सणासुदीला फुलांच्या मागणीत वाढ होते. साधारणता गौरी-गणपतीपासून दिवाळीपर्यंत फुलांना तेजी असते. सणांचा अंदाज घेऊन शेतकरी जून-जुलैमध्ये फुलांची लागवड करतात.
फुलांना उघडझाप महत्त्वाची असते मात्र, यंदा मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. सततच्या पावसाने फुलांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम सध्या आवकेवर दिसत आहे.
आता झेंडूचा दर ८० रुपये किलोपर्यंत असला तरी खंडेनवमी दिवशी मागणी एकदम वाढते आणि दर दीडशे रुपयांच्या पुढे जाईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मोठा हार दोनशेच्या पुढे
देवीच्या मूर्तीसह सत्कारासाठी लागणारे झेंडूचे हार २०० रुपयांच्या पुढे आहेत. शेवंतीच्या फुलांच्या हाराची किमती त्यापेक्षा अधिक असून, त्याच्या आकार व लांबीनुसार दर वाढत जातात.
फुलांचे दर, प्रतिकिलो
भगवा झेंडू - ८०
पिवळा झेंडू - ७५
गलांडा - २००
मोठा शेवंती - ४००
छोटा शेवंती - २४०
पावसामुळे फुलबागांचे नुकसान झाले हे खरे आहे. सध्या फुलाचे मार्केटमध्ये कमालीची चढउतार पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आज एक, तर उद्या दुसराच दर असतो. - सर्जेराव माळी, फूल उत्पादक शेतकरी, सांगरूळ
अधिक वाचा: उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर?