सांगोला : डाळिंब पीक हातचे गेले, दुधाला दर नाही म्हणून शेतकऱ्यांनी मका पीक घेण्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे मक्याचे उत्पादन वाढले आहे.
शेतकऱ्यांकडून बाजारात खरेदी करणारा मका व खरेदी केंद्रात विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या भावात तफावत आहे. त्यामुळे शासनाने आधारभूत किमतीवर मका खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मका केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
राज्य शासनामार्फत किमान आधारभूत २४०० प्रति क्विंटल किमतीवर भरडधान्य खरेदी केंद्र सांगोला या ठिकाणी सुरू केलेल्या मका खरीप केंद्राचा शुभारंभ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार श्रीमती बाळू ताई भागवत यांच्या हस्ते झाला.
शेतकऱ्याला प्रति क्विंटल ६०० रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. सोमवारपासून सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका खरेदी केंद्र सुरू केले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा सुमारे ११० क्विंटल मका खरेदी केला आहे.
९७५ क्विंटल मक्याची नोंद
◼️ सांगोला खरेदी-विक्री संघाकडे गेल्या महिन्याभरापासून सांगोला तालुक्यातील सुमारे ८२५ शेतकऱ्यांनी ९७६ हेक्टर क्षेत्रावरील २२ हजार ९७५ क्विंटल मक्याची नोंद केली आहे तर शेतकऱ्यांसाठी मका नोंदणीची मुदत ३१ जानेवारी २०२६ अखेरपर्यंत वाढवली आहे.
◼️ दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप २०२५-२०२६ मक्याची नोंद असलेल्या चालू उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड झेरॉक्स नोंदणीसाठी आणावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले आहे.
अधिक वाचा: मंगळवेढ्याची मालदांडी थेट लंडनला रवाना; अवघ्या २० किलो ज्वारीसाठी केले १८ हजार रुपये खर्च
