पुणे : एकीकडे लिंबाची आवक कमी होत आहे, तर दुसरीकडे उन्हाच्या चटका जाणवू लागल्याने शहरातील सरबत विक्रेते, रसवंतीगृहे तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांना मागणी वाढली आहे.
त्यामुळे लिंबाच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पाच दिवसात तुलनेत भावात २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
घाऊक बाजारात दर्जानुसार गोणीस ३०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. एका गोणीत आकारानुसार ३०० ते ५५० नग असतात.
मार्केटयार्ड बाजारात राशिणसह अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातून लिंबाची आवक होत आहे. कर्नाटक राज्यातील विजयनगर भागातूनही लिंबाची आवक होत आहे मात्र, याचे प्रमाण कमी आहे.
सध्या येथील बाजारात १ ते दीड हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची पाच रुपयांनी विक्री होत आहे.
उत्पादित भागातील पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने आवक कमी होत आहे.
वाढत्या उन्हाळ्याबरोबर आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे. सध्या शहरासह जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांकडूनही लिंबाची मोठी खरेदी करण्यात येत आहे.
उन्हाची सुरुवात होताच उन्हाच्या चटक्यामुळे मागणी वाढल्यामुळे लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. येत्या काळात भावात आणखी वाढ होणार आहे. यामुळे यंदा लिंबाला सर्वाधिक मागणी राहील. - रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी
अधिक वाचा: कारखानदारांच्या ऊस काटामारीला चाप; आता कारखाना कार्यक्षेत्रात बसणार शासकीय वजनकाटा
