- सुरेश परदेशी
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील चमेली बोरांनी यंदा संक्रांतीपूर्वीच शेतकऱ्यांना 'तीळगूळ' दिला आहे. चमेली बोरांनी यंदा कल्याण आणि नाशिक बाजारपेठेत नाव कमावले असून एकाच दिवसात १४ ते १५ लाखांची उलाढाल केली. तीही बहाळ गावातच. त्यामुळे संक्रांतीअगोदरच शेतकऱ्यांचे तोंड गोड झाले आहे.
जिल्ह्यातील बहाळ परिसरात मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. चमेली बोराच्या लागवडीसाठी बहाळ परिसर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यावर्षी बोरांना किलोमागे २० ते ३० रुपयांनी अधिक दर मिळत असून नाशिक आणि कल्याण या मोठ्या बाजारपेठांमध्ये विशेष मागणी आहे. दररोज बहाळ येथून किमान १० ते १५ टन बोरांचा माल या बाजारपेठांमध्ये पाठविला जात आहे.
नाशिक, कल्याणमधील व्यापाऱ्यांनी मांडले ठाण
बोरांच्या नियमित विक्रीमुळे बहाळ परिसरातील शेतकऱ्यांची दररोजची आर्थिक उलाढाल ही सुमारे ३ ते ५ लाख रुपयांपर्यंत होत होती. मात्र, मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक व कल्याण शहरांमध्ये बोरींना मोठी मागणी निर्माण झाली. याच मागणीचा परिणाम म्हणून ११ रोजी नाशिक आणि कल्याण येथील व्यापाऱ्यांनी थेट बहाळ येथे येऊन खरेदीसाठी ठाण मांडले. या दिवशी व्यापाऱ्यांनी ७० रुपये किलो दराने चमेली बोरांची खरेदी केली.
एकाच दिवशी चमेली बोराची मोठी उलाढाल
बहाळ परिसरात अवघ्या एकाच दिवशी किमान १८ ते २० टन बोरांची खरेदी करण्यात आली. या मोठ्या व्यवहारामुळे त्या दिवशी बहाळ परिसरातील शेतकऱ्यांची अंदाजे १४ ते १५ लाख रुपयांची उलाढाल झाली. संक्रांतीनिमित्त मिळालेल्या या भरघोस भावामुळे आणि मोठ्या उलाढालीमुळे बहाळ परिसरातील बोर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
