वसमत : महाराष्ट्रातील हळदीसाठी प्रसिद्ध असलेले वसमत आता जागतिक नकाशावर झळकू लागले आहे.(turmeric export)
स्थानिक व्यापारी लक्ष्मीनारायण मुरक्या यांच्या जिद्द, चिकाटी आणि दूरदृष्टीमुळे वसमतच्या हळदीला दुबई व मलेशियासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे.(turmeric export)
त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक ओळख मिळत असून, तालुक्याच्या अर्थकारणालाही मोठी चालना मिळाली आहे.(turmeric export)
३०० टनांची आवक, १०० टनांची निर्यात
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी ३०० टन हळदीची आवक होत आहे. यापैकी सुमारे २५० ते ३०० टन हळद देशांतर्गत तसेच परदेशात पाठविली जात आहे.
विशेष म्हणजे, दररोज १०० टनांहून अधिक हळद दुबई आणि मलेशिया येथे निर्यात केली जात असून, ही बाब वसमतसाठी अभिमानाची ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टांना जागतिक व्यासपीठ
वसमत तालुक्यातील सुपीक जमीन आणि अनुकूल हवामानामुळे येथील हळदीचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट मानला जातो.
स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेत असून, त्यांची मेहनत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता वाढली आहे.
'साई ॲग्रो'ची महत्त्वाची भूमिका
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी लक्ष्मीनारायण मुरक्या यांनी 'साई ॲग्रो स्पाईसेस अँड एडिबल प्रॉडक्ट्स प्रा. लि.' या संस्थेची स्थापना केली.
सात ते आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संस्थेचे ऑनलाइन उद्घाटन झाले होते. त्यानंतर या उद्योगाने वेगाने प्रगती करत परदेशी बाजारपेठेत प्रवेश मिळवला.
अर्थकारणाला मिळाली गती
हळदीच्या निर्यातीमुळे वसमतच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. व्यापाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्व घटकांना याचा फायदा होत असून, स्थानिक बाजारपेठेतील उलाढालही वाढली आहे.
वसमतची हळद ही दर्जेदार आहे. तिला जागतिक ओळख मिळवून देणे हेच आमचे ध्येय होते. आज आमची हळद दुबई आणि मलेशियात पोहोचतेय, याचा आम्हाला अभिमान आहे. - लक्ष्मीनारायण मुरक्या, साई ॲग्रोचे संचालक
वसमतच्या हळदीने देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. ही प्रगती कायम राखण्यासाठी गुणवत्ता, प्रक्रिया आणि निर्यात व्यवस्थापन अधिक बळकट करणे गरजेचे ठरणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chilli Export : तिखटाचा जागतिक ठसका; धर्माबादची मिरची झाली ग्लोबल स्टार
