tur bajar bhav : उत्पादनात लक्षणीय घट होऊनही तुरीच्या दरात मोठी उसळी अपेक्षित नसून, मे २०२६ महिन्यात बाजारभाव किमान आधारभूत किमतीच्या आसपासच स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(tur bajar bhav)
'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्षा’(Smart) च्या अहवालानुसार, येत्या काळात तुरीला प्रति क्विंटल सुमारे ७३०० ते ७,६५० रुपये दर मिळण्याचा अंदाज आहे.(tur bajar bhav)
उत्पादन घटले, पण दरात मोठी वाढ नाही
चालू विपणन वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील तुरीचे उत्पादन सुमारे ३४.५५ लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
विशेषतः महाराष्ट्रात तुरीच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित असून ते सुमारे ११.३ लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
उत्पादन कमी असूनही बाजारभावात अपेक्षित वाढ न होणे हे शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण मानले जात आहे.
लातूर बाजाराचा ट्रेंड काय सांगतो?
तुरीसाठी महत्त्वाची मानली जाणारी लातूर बाजारपेठ गेल्या तीन वर्षांत मोठ्या चढ-उतारातून गेली आहे.
मे २०२३: ९,०४२ रुपये प्रति क्विंटल
मे २०२४: ११,८४५ रुपये प्रति क्विंटल (उच्चांक)
मे २०२५: ६,८८१ रुपये प्रति क्विंटल (घसरण)
या पार्श्वभूमीवर, यंदा दर आधारभूत किमतीच्या जवळ स्थिर राहणे शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारे ठरणार आहे.
आवक कमी, तरी दर मर्यादित
तुरीचा मुख्य विक्री हंगाम जानेवारी ते एप्रिल असा असतो. मात्र, यंदा मार्च महिन्यातील बाजारातील आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिल्याचे दिसून आले आहे.
आवक घटली असली तरी दरात मोठी वाढ होत नसल्याने बाजारात संतुलित पण दबावाचे चित्र दिसत आहे.
आधारभूत किंमत व बाजारभाव
केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी तुरीची किमान आधारभूत किंमत (MSP) ८,००० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.
सध्याचे बाजारभाव या पातळीच्या थोडे खाली असले तरी, मे महिन्यात ते ७,३०० ते ७,६५० रुपये दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आयात-निर्यात व जागतिक परिस्थिती
भारत हा तुरीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि उपभोक्ता देश आहे.
२०२४-२५ मध्ये तुरीची आयात वाढून १२.२३ लाख टनांवर पोहोचली
निर्यातीमध्ये घट नोंदवली गेली
केंद्र सरकारने तूर निर्यातीसाठी काही प्रमाणात सवलत दिली असली तरी आयात नियंत्रणाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे देशांतर्गत दरांवर दबाव राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी मिश्र चित्र
उत्पादन घटले असतानाही दरात मोठी वाढ न होणे हे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे. मात्र, दर पूर्णपणे कोसळले नाहीत आणि आधारभूत किमतीच्या जवळ स्थिर राहण्याचा अंदाज असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तुरीच्या बाजारात सध्या स्थिरतेचा ट्रेंड दिसत असला तरी, उत्पादन घट, आयात दबाव आणि मर्यादित दरवाढ या तिन्ही गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादित राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात सरकारी धोरणे आणि बाजारातील आवक यावर दरांची दिशा ठरणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : turmeric export : शेतकऱ्यांचा अभिमान! वसमतची हळद झाली आंतरराष्ट्रीय स्टार
अधिक वाचा : Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
