वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनच्या दरात अवघ्या १३ दिवसांत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.(Soybean Market)
१ मे रोजी प्रतिक्विंटल ७,१६० रुपये कमाल दर मिळालेल्या बिजवाई सोयाबीनने १३ मे रोजी थेट ८,५०० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
त्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
बुधवारी बाजार समिती परिसरात दिवसभर शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाढलेल्या दराची चर्चा रंगलेली दिसून आली. अनेक शेतकऱ्यांनी 'थोडा संयम ठेवला आणि आता त्याचा फायदा झाला,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ
हंगाम संपल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी लगेच विक्री न करता बिजवाई सोयाबीन गोदामात साठवून ठेवले होते.
त्या वेळी बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी दर वाढीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आता बाजारात तेजी आल्याने त्याच मालाला अधिक दर मिळत असून अनेक शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा अतिरिक्त नफा मिळत असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे.
१३ दिवसांत मोठी झेप
१ मे रोजी बिजवाई सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार २३० ते ७ हजार १६० रुपये दर मिळत होता. त्यानंतर बाजारात सातत्याने सुधारणा होत गेली.
१३ मे रोजी त्याच सोयाबीनला ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. यामुळे कमाल दरात प्रतिक्विंटल तब्बल १ हजार ३४० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, बिजवाईसाठी वापरले जाणारे दर्जेदार आणि स्वच्छ सोयाबीन सध्या अधिक मागणीत आहे.
विशेषतः कमी ओलावा असलेला आणि चांगल्या प्रतीचा माल बाजारात उच्च दराने विकला जात आहे.
गुणवत्तेला वाढले महत्त्व
बाजारातील जाणकारांच्या मते, फक्त साठवणूक करून चालत नाही तर मालाची गुणवत्ता टिकवून ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने साठवणूक केलेला, स्वच्छ आणि दर्जेदार मालच व्यापाऱ्यांकडून अधिक दराने खरेदी केला जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीदरम्यान ओलावा नियंत्रण, स्वच्छता आणि मालाची प्रत टिकवून ठेवण्यावर भर द्यावा, असा सल्लाही व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.
सोयाबीनच्या दरात झालेल्या या वाढीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळातही बाजारातील तेजी कायम राहते का, याकडे आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : Halad Market : हळदीच्या बाजारात मोठा ट्विस्ट; एका दिवसात शेतकऱ्यांचे गणित बिघडले
