लासूर स्टेशन : कांद्याच्या सतत घसरत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून येऊ लागला आहे.(Kanda Market)
लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी एका शेतकऱ्याने थेट मार्केटच्या गेटसमोर ट्रॅक्टरमधील कांदा रस्त्यावर टाकून आंदोलन केले.(Kanda Market)
'कांद्यापेक्षा भंगाराला जास्त भाव मिळतो,' अशी संतप्त प्रतिक्रिया देत शेतकरी भर उन्हात कांद्याच्या ढिगाऱ्यावर उभा राहून निषेध व्यक्त करत होता.(Kanda Market)
करंजगाव येथील शेतकरी विश्वनाथ उगले यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा प्रतिक्विंटल अवघ्या १०० रुपयांनी विकला गेला.(Kanda Market)
२० क्विंटल कांद्याला केवळ २ हजार रुपये मिळाल्याने शेतकरी हतबल झाला. मात्र, कांदा बाजारात आणण्यासाठी ट्रॅक्टर भाडे, मजुरी आणि इतर खर्च मिळून जवळपास २ हजार ९०० रुपये खर्च झाल्याने शेतकऱ्याच्या खिशातूनच पैसे भरण्याची वेळ आली.(Kanda Market)
खर्च लाखोंमध्ये; उत्पन्न मात्र तोट्यात
विश्वनाथ उगले यांनी यंदा तीन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. बियाणे, रोप तयार करणे, लागवड, औषध फवारणी, मजुरी, सिंचन आणि काढणी यावर मोठा खर्च झाला.
एका एकरासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च आल्याने एकूण खर्च २ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचला.
या क्षेत्रातून सुमारे ३०० क्विंटल कांदा उत्पादन झाले. मात्र, सध्याच्या बाजारभावानुसार संपूर्ण कांदा विकला तरी अवघे ३० हजार रुपये मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
'भंगाराला जास्त भाव, कांद्याला कमी'
कांद्याला मिळणाऱ्या दरावर संताप व्यक्त करताना शेतकऱ्यांनी बाजारातील भंगाराच्या दरांची तुलना केली. प्लास्टिक भंगाराला १५ रुपये किलो, पत्र्याच्या भंगाराला २७ रुपये किलो आणि लोखंडी भंगाराला ३२ रुपये किलो दर मिळतो.
मात्र, कांद्याला केवळ १ ते ११ रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट कवडीमोल ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
'कांद्याला १०० रुपये क्विंटल दर मिळत असेल तर शेतकरी जगणार कसा? व्यापारी मनमानी दर देत आहेत. शासनाने कांद्याला हमीभाव आणि अनुदान जाहीर करावे,' अशी मागणी शेतकरी विश्वनाथ उगले यांनी केली.
प्रशासनाकडून आश्वासन
शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे काही काळ बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची समजूत काढली आणि मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सचिव संतोष पवार यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रतवारी केलेला कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले. 'बाजार समिती शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे,' असे त्यांनी सांगितले.
कांद्याच्या सतत कोसळणाऱ्या दरामुळे राज्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
