नाशिक : तांदूळ उत्पादनात झालेली घट आणि बदलत्या जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम आता सामान्यांच्या ताटावर होऊ लागला आहे. गेल्या महिन्याभरापासून बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीचे दर घसरलेले असताना, त्याचा फायदा ग्राहकांना मिळण्याऐवजी मिलमालकांनी साठेबाजी आणि दरवाढ केल्याचे चित्र दिसत आहे. यंदा पाऊस वेळेवर न पडणे किंवा काही भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे एकूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.
उत्पादन खर्च: खते, बी-बियाणे आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे, ज्याचा परिणाम अंतिम किमतीवर होत आहे. उत्पादन घटल्यामुळे बसला फटका यंदा पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि काही भागात पडलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तांदळाच्या एकूण उत्पादनात १० ते १५ टक्क्यांची घट झाली आहे. आवक कमी असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.
आखाती युद्धामुळे दर घसरूनही भाववाढ !
इराण आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताची बासमती निर्यात मंदावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्याने दर कमी झाले आहेत. मात्र, निर्यात न झालेला माल स्थानिक बाजारात स्वस्त दरात येण्याऐवजी, मिलमालकांनी भविष्यातील तुटवड्याचे कारण पुढे करत आधीच दर वाढवून ठेवले आहेत.
नवीन तांदूळ तरी दर चढेच
साधारणपणे नवीन तांदूळ बाजारात आला की जुन्या तांदळाचे दर स्थिर होतात किंवा कमी होतात. मात्र, यंदा नवीन आवक सुरू होऊनही बाजारात मंदीऐवजी तेजीच पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, इंधन दरवाढ आणि वाहतूक खर्च वाढल्याने तांदूळ स्वस्त होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.
तांदूळ किलोमागे किती दर
- बासमती - एप्रिल महिना - १७५ रुपये, तर मार्च महिना १६० रुपये
- तिबार - एप्रिल महिना - १३० रुपये, तर मार्च महिना ११० रुपये
- मोगरा - एप्रिल महिना - ६० रुपये, मार्च महिना ५५ रुपये
- कोलम - एप्रिल महिना - ६४ रुपये, मार्च महिना ६० रुपये
- इंद्रायणी - एप्रिल महिना - ६४ रुपये, मार्च महिना ६० रुपये
उत्पादन कमी असल्याने मागूनच माल महाग येत आहे. त्यातच निर्यातीचे धोरण आणि जागतिक युद्धाचा परिणाम स्थानिक बाजारावर होत असल्याने यंदा तांदळाच्या किमती थोड्या वाढल्या आहेत.
- प्रफुल्ल संचेती, किराणा व्यापारी संघटना
