- शेखर देसाई
लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. केवळ जानेवारी महिन्यात जिल्ह्यात ३५ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाल्याची नोंद आहे.
देशांतर्गत तसेच परदेशी बाजारातील मागणीमध्ये घट होताना दिसत आहे. आखाती देशांमधूनही मागणी घटत असल्यामुळे बाजारभावातही घट होत आहे. गेल्या महिन्यामध्ये सरासरी बाजारभावात सुमारे ७७० रुपयांची घसरण झाली आहे.
आवक वाढल्याने झालेल्या या दर घसरणीचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सध्याच्या मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या स्वरूपात विक्री होणाऱ्या प्रत्येक क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
सुमारे २७० कोटी रुपयांचे नुकसान
महिनाभरामध्ये जिल्ह्यातील कांद्याच्या सरासरी दरामध्ये ७७० रुपयांनी घट झाली. बाजार समित्यांमध्ये ३५ लाख क्विंटल कायद्याची आवक झाली. या सर्वच कांद्याला ७७० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर कमी मिळाला, असे गृहीत धरले तरी शेतकऱ्यांचे २६९.५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सरासरी दरामध्ये ७७० रुपयांची घट
जिल्ह्यातील प्रमुखझालेल्या ३५ लाख क्विंटल कांदा आवकेपैकी लासलगाव बाजार समिती तसेच उपबाजार विंचूर आणि निफाड येथील एकूणआवक १० लाख ५४ हजार ६०६ क्विंटल झाली आहे. कांद्याला १ जानेवारी २०२६ रोजी जास्तीत जास्त २६११ रुपये, कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १८७० रुपयांचा दर मिळाला. ३१ जानेवारी रोजी जास्तीत जास्त १४६० रुपये, कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला आहे. महिनाभरात सरासरी दरामध्ये ७७० रुपयांनी घट झाली आहे.
चार एकरांवर लाल कांद्याचे पीक घेतले. लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला असता २०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. यातून उत्पादन खर्चही निघणेही मुश्कील झाले आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिक घेणे परवडू शकेल
- कैलास जाधव, शेतकरी, पिंपळगाव नजीक
बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांत मोठ्या प्रमाणात भारतीय कांद्याची निर्यात केली जात होती. मात्र बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार व तेथील स्थानिक कांदा निघण्यास सुरुवात झाल्याने कांद्याचे परवाने देणे बंद केले आहेत. श्रीलंकेने ५० रुपये आयात शुल्क लागू केल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. नेपाळमध्ये कांद्याची मागणी घटली तसेच आखाती देशांमध्ये पाकिस्तान, चीनचा स्वस्त दरातील कांदा उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याला परदेशातून मागणी घटल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे.
- मनोज जैन, कांदा निर्यातदार
