नाशिक : देवळा बाजार समिती आवारात कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे (Kanda Market Payment) पैसे १ जानेवारीपासून शेतकऱ्यांना बाजार समिती (Deola Kanda Market) कर्मचाऱ्यांमार्फत कार्यालयातच वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांना पेमेंट वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
देवळा बाजार समितीच्या संचालक मंडळाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (onion Farmer) देवळा बाजार समितीकडे आकृष्ठ करण्यासाठी कालानुरूप बदल करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे २४ तासांच्या आत देण्याच्या सक्त सूचना बाजार समिती प्रशासनाने कांदा व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु, काही कांदा व्यापारी शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे वेळेवर देत नसल्याची बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आली होती.
त्यामुळे १ जानेवारीपासून व्यापाऱ्यांनी लिलाव झाल्यानंतर खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे बाजार समितीत जमा करावे, बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रीच्या पैशांचे वेळेवर वाटप करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सदर निर्णयामुळे देवळा शहरातील व्यापार उदिमात देखील वाढ होणार असल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. भूसार मार्केटमध्ये सकाळी ११ वाजता, तसेच दुपारी ४ वाजता लिलाव केला जातो.
टोकनप्रमाणे होतात लिलाव...
बाजार समिती आवारात कांदा ट्रॅक्टर लिलावासाठी न आणता त्या 3 ठिकाणी दोरी बांधून नंबर लावत. जागा अडवणाऱ्या दोरी बहाद्दर शेतकऱ्यांना चाप लावून कांदा लिलावासाठी येणाऱ्या ट्रॅक्टरना टोकन पद्धत सुरू करून शिस्त लावली आहे. टोकन देऊन नंबरप्रमाणे व शिस्तीने लिलावासाठी येणारी वाहने आवारात लावण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, यामुळे समिती आवारातील बेशिस्तपणाला आळा बसला आहे.
समस्या निवारणासाठी कर्मचारी नियुक्त....
कांदा लिलावाची वेळ सकाळी 3 साडेनऊ वाजता व सायंकाळी साडेचार वाजता असून, ४ कर्मचारी लिलाव प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. लिलाव झाल्यानंतर ट्रॅक्टर खाली करताना कांद्यात निघणारा वांधा, शेतकऱ्यांचे पेमेंट आदी विविध समस्या सोडवण्यासाठी कांदा नियोजक सहायक सचिव डी. व्ही. सूर्यवंशी यांची स्वतंत्र नेमणूक केली आहे.