Kanda Market : गेल्या पाच सहा महिन्यांपासून कांद्याच्या बाजारात (Onion Market) सुधारणा दिसून येत नाही. उलट बाजार अधिकाधिक कमी होत आहेत. दुसरीकडे नाफेडने कांदा (Nafed Onion) बाजारात आणल्यानंतर २४ रुपयांनी विक्री सुरु केली. आता यात कपात करत २१ रुपये किलो दराने विक्री सुरु केली आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये दर आणखी घसरण्याची चिन्हे आहेत.
आज १५ सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२७० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११७५ रुपये, उमराणे बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला.
तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १४२५ रुपये दर मिळाला. पुण्यात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ९५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे मुंबई कांदा बटाटा मार्केटला सरासरी ११०० रुपये दर मिळाला.
शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो पाच ते दहा रुपये इतका निचांकी बाजारभाव मिळत आहे. तर सरकारी खरेदीतील बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजार भाव अजूनच कमी होत आहेत. देशामध्ये सर्व काही महाग झाले तरी चालते, परंतु कांदा आणि शेतकऱ्यांचा शेतमाल स्वस्तातच मिळाला पाहिजे, ही सरकारची मानसिकता आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहेत.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना