Makka Bajarbhav : चांदूर बाजार येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २ ते ३ दिवसांपासून मक्याच्या आवकेत(Makka Arrivals) विक्रमी वाढ झाली असून बाजार समितीच्या अंगणात मका वाहून आणणाऱ्या गाड्यांची मोठी रांग लागलेली दिसत आहे.
सोमवारपासून सुरू झालेली ही वाढ आजही कायम असून समितीमध्ये हजारो क्विंटल मका दाखल होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मका दाखल
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने मध्य प्रदेशात मक्याचे उत्पादन भरघोस झाले. शेतकऱ्यांनी काढणी सुरू होताच माल तात्काळ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला.
परिणामी, चांदूर बाजारसह अकोला, अमरावती, वाशीम परिसरातील बाजार समित्यांमध्येही मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचा ओघ वाढला आहे.
उत्पादन वाढले, स्पर्धाही वाढली
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा आवक जास्त आहे आणि बाजारातील स्पर्धा देखील वाढलेली दिसत आहे. बाजारात एकूण व्यवहार वाढल्याने व्यापाऱ्यांचा प्रतिसादही चांगला आहे.मोजणीनंतर लगेच पेमेंट होत असल्यामुळे शेतकरी बाजार समितीला प्राधान्य देत आहेत. - मनीषा भारंबे, सचिव, बाजार समिती
मक्याचे दर गुणवत्तेनुसार
मका दरात दिवसेंदिवस चढ-उतार होत असले तरी बाजारातील एकूण भाव खालीलप्रमाणे दिसून आले आहेत
उत्तम प्रतीचा मका (कमी आर्द्रता) : १,६०० ते १,७०० रु. प्रतिक्विंटल
मध्यम प्रतीचा मका : १,३०० ते १,५०० रुपये प्रतिक्विंटल
अधिक आर्द्रता असलेला मका : १,१०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल
उत्पादनाची गुणवत्ता, आर्द्रतेचे प्रमाण आणि धान्याची स्वच्छता यानुसार व्यापारी भाव ठरवत आहेत. काही शेतकरी सध्याच्या दरांवर समाधानी असले तरी काहींना अपेक्षित भाव अजून मिळत नसल्याचेही दिसून आले.
बाजारात उलाढाल वाढण्याची शक्यता
सध्या काढणीनंतरचा हंगाम सुरू झाल्यामुळे मक्याची आवक आगामी काही दिवस अजून वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील माल मोठ्या प्रमाणात येत असल्याने व्यापाऱ्यांची स्पर्धा वाढेल आणि दरात आणखी थोडी चढ- उतार होण्याची संभाव्यता असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
हे ही वाचा सविस्तर :Washim APMC : वाशिम बाजार 'हाऊसफुल'; सोयाबीन–हळदीची सर्वाधिक दैनंदिन आवक
