Maka Export : नाशिक जिल्ह्यात यंदा मक्याचे अपेक्षित असे उत्पादन झाले असल्याने बाजारात आवक चांगली सुरु आहे. त्यामुळे मका इतर ठिकाणी पाठवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबमधून मोठी मागणी होत असल्याने या हंगामात पहिल्यांदा पंजाबच्या दिशेने जवळपास २६८५ टन मका रेल्वेद्वारे पाठवण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक होऊ लागली आहे. एकट्या लासलगाव बाजारामध्ये दररोज ८ हजार ते ९ हजार क्विंटल मका येत आहे. याचा परिणाम बाजारावर झाला असून मक्याला प्रति क्विंटल १५०० ते १६०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारपेठेत मक्याच्या विक्रीमधून मोठी उलाढाल होत आहे. चालू हंगामात पहिल्यांदाच रेल्वेद्वारे २६८५ टन मका ४२ रेल्वे डब्यांच्या माध्यमातून पंजाबला पाठवण्यात आला. ज्यामुळे वाहतूक खर्चात बचत व वेळेची बचत झाली आहे. पंजाबमधील पोल्ट्री फीड उद्योगांकडून मक्याला अधिक मागणी असूनपुढील काही दिवसांत आणखी रेक पाठवले जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पूरक उद्योगांसाठीही पंजाबहून जास्त मागणी
महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्ये देखील कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पंजाब राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये यंदा मक्याची जास्त आवक आहे. त्यामुळे पंजाबमध्ये असलेले मकापूरक उद्योग व कुक्कुटपालन पशुखाद्यासाठी महाराष्ट्रातील मक्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
