नाशिक : राज्यात मका उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी दि. ३० डिसेंबर २०२५ पासून तालुक्यात केंद्रामार्फत मका खरेदी सुरू झाली. या केंद्रांना मका खरेदीचे उद्दिष्ट देखील देण्यात आले आहे. मात्र नोंदणी केलेले शेतकरी आणि प्रत्यक्षात खरेदी झालेला मका यामध्ये मोठी तफावत असल्याने मुदतीत खरेदी प्रक्रीया कशी पूर्ण होणार याबाबत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी प्रक्रीया सुरू झाली असली तरी मुदत मात्र २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. मात्र ही खरेदीची मुदत अजूनही वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. व्यापाऱ्यांकडे चांगला दर मिळत नसल्याने शासनाने केंद्र सुरू केले आहेत. शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळाला असून नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
बाहेर बाजारात अवघे १६०० ते १७०० दराने मका खरेदी होत आहे. तर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी सुरू आहे. त्यामुळे या खरेदी केंद्राकडे शेतकरी वळत आहे. आता शेतकरी मुदत वाढविण्याची मागणी करीत आहेत. नोंदणी करूनही माल अद्याक खरेदी करण्यात आलेली नसल्याने माल पडून राहाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
मका खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. शासनाने जर खरेदीचे उद्दिष्ट वाढविले तर खेरेदीदेखील वाढविण्यात येईल. अनेक जणांचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे उर्वरित प्रक्रिया येत्या काळात पूर्ण करणार आहोत.
- तुषार बाविस्कर, शेतकरी सहकारी संघ, मालेगाव
दोन महिने झाले नोंदणी केली आहे. तरीदेखील अद्याप कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. केंद्रात माहिती मिळवण्यासाठी गेले असतो
उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.
- मनीषा सूर्यवंशी, शेतकरी, दसाने शिवार
शासनामार्फत मका साठवणुकीसाठी गुदामाची व्यवस्था व्हावी, तसेच बारदानाची पूर्तता झाल्याने अडचण येत नाही. गेल्या महिन्यात दहा दिवस या बारदानाच्या अभावामुळे खरेदी बंद पडली होती. वेळीच ही सुविधा मिळाल्यास अशी वेळ येणार नाही.
- लक्ष्मण सोनवणे, व्यवस्थापक, चांदवड तालुका खरेदी-विक्री संघ, चांदवड
चांदवड खरेदी विक्री संघात शासनाची मका खरेदी सुरु असली तरी याचे पैसे वेळीच मिळाल्यास ही सुविधा चांगली आहे. पैसे उशीरा मिळाले तर शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळत नाही.
- अर्जुन लक्ष्मण गांगुर्डे, शेतकरी, निंबाळे
