नाशिक : जिल्ह्यातील काही आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर मका खरेदीला सुरवात झाली आहे. सध्या विसापूर या केंद्रावर ५८९ शेतकऱ्यांची २६ हजार क्विंटल मक्याची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे.
मक्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये हमीभाव
या केंद्रावर मक्यासाठी २४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या दर काय मिळतोय ?
सध्या येवला बाजारात पिवळ्या मक्याला सरासरी १८३० रुपये, मलकापूर बाजारात १७४५ रुपये, सिल्लोड बाजारात १७०० रुपये तर सफेद गंगा मक्याला शहादा बाजारात २४२० रुपये तर राहुरी मार्केटला १५२५ रुपये दर मिळाला.
तसेच लाल मक्याला पुणे बाजारात २६०० रुपये, अमरावती बाजारात १७०० रुपये, जालना बाजारात १६५० रुपये तर मुंबई बाजारात लोकल मक्याला ३२५० रुपये दर मिळाला. लासलगाव निफाडमध्ये सर्वसाधारण मक्याला १५८० रुपये, श्रीरामपूर बाजारात १६०० रुपये दर मिळतोय.
ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच मका हमीभावाने खरेदी केला जाईल. ३१ डिसेंबर ही नोंदणीची अंतिम मुदत असून, २८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी सुरू राहील. शेतकऱ्यांनी योग्य दर्जाचा, १३ टक्के आद्रतेचा व योग्य प्रतवारीचा मका खरेदी केंद्रावर आणून सहकार्य करावे.
- सुनील बच्छाव, केंद्र प्रमुख, विसापूर
