नाशिक : मार्च एंडिंग सुरु (March End) असल्याने शिवाय अनेक सुट्ट्याही लागून आल्याने शुक्रवारपासून पुढील पाच दिवस लासलगाव बाजार समितीचे कामकाज बंद राहणार आहे. या काळात कांदा लिलाव होणार नसून केवळ भाजीपाला व द्राक्षमणीचे लिलाव नियमित सुरू राहणार आहेत.
एकीकडे नुकतेच केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविण्याचा (Niryat Shulk) निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे. परिणामी ०१ एप्रिलनंतर कांदा बाजारात भाववाढ होईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशातच मार्च अखेरमुळे शुक्रवारी, 28 मार्च ते मंगळवार 1 एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा व भुसार मालाचे लिलाव होणार नाहीत, अशी माहिती लासलगाव बाजार (Lasalgoan Market) समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
याबाबत लासलगाव बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी व्यापारी बाहेरगावी जाणार आहेत, तसेच शनिवारी अमावस्या, रविवारी गुढीपाडवा शिवाय साप्ताहिक सुटी, सोमवारी रमजान ईद तसेच मंगळवारी १ एप्रिलमुळे बँक व्यवहार बंद असल्यामुळे एकूण 5 दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहतील. या दरम्यान शेतकऱ्यांनी कांदा व भुसारमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात येत आहे.
एप्रिलमध्ये कांदा निर्यात शुल्क रद्द
बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव 2 एप्रिलपासून नियमित होतील. एप्रिलपासून कांदा निर्यातमूल्य शुल्क रद्द केले जाणार असल्याने कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात कांद्याचे काय भाव निघतात याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली आहे. दुसरीकडे आता पाच दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.