भोकरदन/हिसोडा : पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली असली, तरी या तेजीचा पूर्ण फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे.(Lal Mirchi Bhav)
अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे यंदा मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.(Lal Mirchi Bhav)
दर वाढले, पण मालच कमी
सध्या बाजारात चांगल्या प्रतीच्या लाल मिरचीला २२० ते २३० रु. प्रति किलो, तर घाऊक बाजारात २५० रु. प्रति किलो दर मिळत आहे.
काही उच्च प्रतीच्या मिरचीचे दर ४०० रु. प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, उत्पादन घटल्याने अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा मालच उपलब्ध नाही.
हवामानाचा फटका
यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस आणि प्रचंड उष्णतेमुळे मिरची पिकावर मोठा परिणाम झाला. फुलधारणा कमी झाली, तर काही ठिकाणी पिके पूर्णपणे खराब झाली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारातील आवक जवळपास निम्म्यावर आली आहे.
खर्च वाढला, उत्पन्न अनिश्चित
मिरची लागवडीसाठी बियाणे, औषधे, खत आणि मजुरी यावर मोठा खर्च झाला. मात्र, उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. दर वाढले असले तरी विक्रीसाठी मालच कमी असल्याने निव्वळ नफा मर्यादित राहतो आहे.
दर वाढले हे खरं आहे, पण आमच्याकडे विकायला मिरचीच कमी आहे. उत्पादन भरपूर असते तर या दरात चांगला नफा मिळाला असता, असे शेतकरी सांगतात.
बाजारातील स्थिती
लाल तिखट: २५० रु. प्रति किलो
रसगुल्ला मिरची: २४० रु. प्रति किलो
तेजस्वीनी मिरची: ४०० रु. प्रति किलो
मिरची पावडर: २५० ते ४५० रु. प्रति किलो
पुढील अंदाज काय?
व्यापाऱ्यांच्या मते, नवीन मिरची बाजारात येईपर्यंत दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. मात्र, उत्पादन स्थिती सुधारली नाही तर पुढील हंगामातही शेतकऱ्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो.
लाल मिरचीच्या दरात तेजी असली तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. हवामानातील बदल आणि वाढता खर्च यामुळे शेतीतील जोखीम वाढत असून, शाश्वत उत्पादनासाठी योग्य नियोजन आणि तांत्रिक मदतीची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाने गाठली विक्रमी उंची; जाणून घ्या काय आहे कारण
