नाशिक : उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी चालू हंगामातील नवीन लाल पावसाळी कांदा विक्रीस दाखल झाला. तालुक्यातील दहिवड येथील शेतकरी अशोक पोपट सोनवणे यांनी हा कांदा विक्रीस आणला होता. कांदा व्यापारी सुनील देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत प्रतिक्विंटल १५०१ रुपये दराने तो खरेदी केला.
दरवर्षी विजयादशमी (दसरा) सणानंतर खऱ्या अर्थाने नवीन लाल (पावसाळी) कांदा बाजारात विक्रीस येण्यास सुरुवात होते. मात्र, आगळावेगळा प्रयोग म्हणून दरवर्षी काही शेतकरी इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एक ते दीड महिना आधीच लाल कांदा लागवड करून अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच धर्तीवर दहिवड येथील शेतकरी अशोक सोनवणे यांनी जुलै महिन्यात लाल कांदा लागवड केली होती.
कांदा दर ऐकण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
त्यामुळे आपसूकच हा कांदा वेळेआधीच म्हणजेच साधारणतः एक महिना आधीच काढणीला आल्याने येथील बाजार समितीत विक्रीस हा कांदा आणला होता. यावेळी कांदा खरेदीदार व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, वेळेआधीच लाल कांदा विक्रीस आल्याने कांदा बघण्यासाठी तसेच या कांद्याला काय बाजारभाव मिळतो, यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
लाल कांद्याचे पूजन
चालू हंगामातील नवीन लाल कांदा पहिल्यांदाच समितीत विक्रीस आल्याने बाजार समिती प्रशासनाच्या वतीने लाल कांद्याचे पूजन करण्यात आले. तसेच सभापती देवानंद वाघ व उपसभापती प्रवीण देवरे यांच्या हस्ते शेतकरी सोनवणे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.