नाशिक : उन्हाळ्यात नेहमीच चव देणारा फळांचा राजा आंबा चक्क गुलाबी थंडीत मिळू लागल्याने फळ बाजारातील गोडवा वाढला आहे. केरळमधील लालबाग, नीलम आंबा ३०० ते ३५० रुपये किलो असून, ग्राहकांकडून त्याला मागणी आहे. परदेशातील फळांचे आगमन झाल्याने फळ बाजारातील सुगंध अधिक वाढला आहे.
आवक जास्त असली तरी परदेशी फळांचा भाव मात्र अधिक आहे. गोड आंब्यासोबतच बाजारात लज्जतदार कैरीही मिळत आहे. विविध भाजी विक्रेत्यांकडे प्रामुख्याने तोतापुरी कैरी उपलब्ध असून, आंबट गोड कैरीची १५० ते २०० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. नाशिकच्या बाजारपेठेत आठवड्याला ३० हजार किलो आंबा केरळ व बंगळुरूमधून आयात होत आहे.
न्यूझीलंड, आस्ट्रेलियाचा दबदबा; २०० ते ४०० भाव
थंडी वाढताच फळांच्या बाजारात न्यूझीलंड व आस्ट्रेलियाच्या फळांचा दबदबा वाढला आहे. बाजारात सध्या मिळणारी निम्म्याहून अधिक फळे या दोन देशांमधून आयात होत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च पकडता हे सर्वच फळे २०० ते ४०० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत.
दीड महिना चव देणार, मग कोकणचा येणार
केरळ तसेच बंगळुरूचा आंबा अजून दीड महिना तरी चांगल्या प्रमाणात उपलब्ध असेल, त्यानंतर कोकणातला आंबा नेहमीच्या सिझननुसार बाजारात येईल. त्यामुळे ग्राहकांना पुढील आठ ते नऊ महिने आंब्याची चव चाखता येईल, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
इराण, काश्मीरचे सफरचंद आवाक्यात
काश्मीरमधून सफरचंदांची आवक एक नोव्हेंबरपासून दुपटीने वाढली आहे. चांगल्या दर्जाचे काश्मिरी सफरचंद १२० ते १६० रुपये किलो आहे. इराणचे सफरचंद १८० ते २००, न्यूझीलंडचे सफरचंद ३५० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे.
