बुलढाणा : राज्यभरात कापसाच्या बाजारभावात घसरणीचा कल दिसून येत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर ४.२६ टक्क्यांनी खाली आले आहेत. राजकोट बाजार समितीतील मागील आठवड्याची कापसाची सरासरी किंमत ७२५१ रुपये प्रती क्विंटल इतकी होती; परंतु या आठवड्यात त्यात ४.२६ टक्क्यांची घट झाली आहे.
म्हणजेच बाजारभाव आता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली गेला आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत ७७१० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे; परंतु सध्या हमीभाव मिळत नाही.
कापसाच्या आवकेमध्ये चढ-उताराचा परिणाम
राष्ट्रीय स्तरावर कापसाची आवक ४९.७७ टक्क्यांनी घट झाली आहे, तर राज्य पातळीवर किंचित वाढ नोंदवली गेली आहे. यामागे हवामानातील अनिश्चितता, कापूस वेचणीचा प्रारंभिक टप्पा आणि व्यापाऱ्यांचा प्रतीक्षावृत्तीचा कल हे घटक कारणीभूत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
कापूस बाजाराची स्थिती
यंदा कापूस पिकाचं पावसानं अतोनात नुकसान केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत आवक कमी असून मागील काही दिवसांचा बाजारभावाचा आढावा घेऊयात...
०७ ऑक्टोंबर रोजी सावनेर बाजारात ०६ हजार ३०० रुपये, ०८ ऑक्टोंबर रोजी याच बाजारात सरासरी ६ हजार रुपये, ०९ ऑक्टोबर रोजी या बाजारात ६ हजार ५०० रुपये तर महागाव बाजारात ६ हजार १०० रुपये दर मिळाला.
तसेच १० ऑक्टोंबर रोजी सावनेर बाजारात सरासरी ६ हजार ५०० रुपये, ११ ऑक्टोंबर रोजी वरोरा बाजारात सरासरी सहा हजार रुपये तर महागाव बाजारात ६ हजार ५०० रुपये तर १३ ऑक्टोबर रोजी सावनेर बाजारात सरासरी ०६ हजार ५०० रुपये दर मिळाला. साधारण ५० ते ४०० क्विंटलपर्यंत कापसाची आवक सध्या सुरू आहे.