जळगाव : जिल्ह्यात एकीकडे सीसीआयच्या जाचक अटी आणि दुसरीकडे खासगी बाजारात मिळणारा कमी भाव, या दुहेरी कारणामुळे जिल्ह्यातील कापसाची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सध्या कापूस विकणे थांबविल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात सीसीआयची खरेदी केंद्र सुरू होऊन महिना उलटला तरी, या केंद्रांवर केवळ ३० ते ३५ हजार गाठींपर्यंतच कापसाची आवक झाली आहे. दुसरीकडे, संपूर्ण खान्देशाचा विचार केल्यास खासगी बाजारातही केवळ २ ते अडीच लाख गाठी इतकीच आवक झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खासगी बाजारात ४ लाख गाठींची आवक झाली होती.
जिल्ह्यातील सध्याची स्थिती - कापसाचे दर
- खासगी बाजारातील भाव - ६९०० ते ७ हजार
- सीसीआयचा भाव - ७८०० ते ८१००
- कापसची आवक
- खासगी बाजारातील आवक - २ ते अडीच लाख गाठी
- सीसीआयमधील आवक - ३५ हजार गाठी
३१ डिसेंबरनंतर दरात वाढ होण्याची आशा..?
सध्या खासगी बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची तीव्र अपेक्षा आहे. भारताने विदेशातील कापसावरील आयात शुल्क पूर्णपणे हटवले होते, ज्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे.
ही मुदत संपल्यानंतर देशात आयात होणारा कापूस महाग होईल आणि भारतातील कापसाची मागणी वाढेल. त्यामुळे बाजारात कापसाचे दर वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी सध्या कापूस विक्री करणे टाळले आहे.
कापसाची आवक मंदावली आहे. खासगी बाजारात नसलेले भाव, शासकीय केंद्रावर काही जाचक अटी, अशांमुळे शेतकरी भाव वाढीच्या अपेक्षेने आपला माल बाजारात आणताना दिसत नाही. सध्या तरी भाव वाढतील अशी शक्यता कमी आहे.
- अनिल सोमानी, संचालक, खान्देश जिनींग असोसिएशन
