Kanda Market : नाशिकसह राज्यातील महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये दरातील घसरण सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. त्यातही दिवसेंदिवस आवक वाढतेच आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारासह शासनाचे धोरण कांदा दर घसरणीला कारणीभूत ठरत आहे.
येवला मार्केटमध्ये लिलाव सुरू झाल्यानंतर किमान २०० रुपये तर कमाल १ हजार ९१ रुपये प्रति क्विंटल दर पुकारला गेला. सरासरी ७५० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकावा लावत असल्याने बळीराजाचे गणित बिघडले आहे.
गेल्या पंधरवड्यात ४ हजारांच्या पुढे असलेले बाजारभाव आज निम्म्यावर आले आहेत. सकाळच्या सत्रात ४२० ट्रॅक्टर, तर दुपारच्या सत्रात सुमारे ३५० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. आता रांगडा कांदा बाजारात दाखल झाल्याने दर वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहेत. कांद्याला उत्पादन खर्चही कांदा विक्रीतून सुटत नाही.
सिन्नर : सिन्नर मार्केटमध्ये काल कांद्याची एकूण ४३२० क्विंटल आवक झाली. दिवसभरात एकूण १९० वाहनांद्वारे कांदा बाजारात दाखल झाला. वाढत्या आवकेमुळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला. लाल कांद्याला किमान १०० रुपये प्रतिक्विंटल, कमाल १०७५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सरासरी भाव ८०० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला.
पिंपळगावचे कांदा दर
पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सलग तीन दिवस घसरण पाहायला मिळाली असली तरी येथे लिलाव प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पडली. सोमवार (दि. २३) रोजी कांद्याला किमान ६५० रुपये, कमाल १६०० रुपये आणि सरासरी २५० रुपये दर मिळाला. मंगळवार (दि. २४) रोजी दरात घसरण होऊन किमान ६००, कमाल १४७२ आणि सरासरी २२५ रुपये भाव मिळाला. बुधवार (दि. २५) रोजी किमान ६००, कमाल १४७२ आणि सरासरी २०० रुपये दर नोंदवला गेला.
Read More : एका बिघ्याला 10 क्विंटल हरभरा उत्पादन, काढणीला मजुरी किती लागली, भाव काय मिळाला?*
