Kanda Market : सध्या कांदा निर्यातीवर कुठलेही बंधने नसले तरी कांद्याची निर्यात (Kanda Niryat) संथगतीने होत आहे. सर्वात जास्त कांदा निर्यात होणाऱ्या बांगलादेशात स्थानिक कांदा सुरू असल्याने तेथे भारतीय कांद्याची मागणी कमी आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या वाढीसाठी उपाययोजना केल्या आणि नाफेड (Nafed) व एनसीसीएफच्या बफर स्टॉकसाठी थेट बाजार समित्यांमधून लिलावद्वारे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला, तरच कांद्याच्या दरवाढीची संधी दिसत आहे.
कांद्याला (Kanda Market) पुढील काळात भाववाढ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी प्रतवारी करून आपापला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. देशांतर्गत मागणी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी कांदा निर्याती संदर्भातील सरकारी उपयोजना यावरच कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून आहे.
नाशिक जिल्ह्यात 2023 - 2024 च्या हंगामात दुष्काळ असल्याने कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होते. परंतु 2024-2025 च्या हंगामात पाऊसमान चांगले झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे. बेमोसमी पावसाने आधीचे कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा रोपे तयार करून कांदा लागवड केल्याने यावर्षीच्या हंगामात उन्हाळी कांद्याच्या दोन टप्प्यात लागवडी झाल्या होत्या.
त्यातील आगाप कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर उत्पादन चांगले मिळाले आहे. तर उशिराने लागवड केलेल्या कांद्यांना थंडी कमी प्रमाणात मिळून वाढलेल्या तापमानामुळे प्रति एकर कांद्याच्या उत्पादनात घट दिसून आली आहे. तरीही एकूण लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कांदा उत्पादन झाले आहे.
कांदा साठवणुकीवर भर
आता बहुतेक शेतकऱ्यांची कांदा काढणी झाली असून सध्या कांद्याला बाजारभाव अत्यल्प मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा कल कांदा साठवणुकीवर दिसून येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा काढणी करून चाळींमध्ये साठवून झाला आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून बेमोसमी पाऊस व गारपिटीने काही भागांमध्ये काढणी करणे शिल्लक असलेला कांदा शेतातच भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे.
सरकारी कांदा खरेदीची प्रतीक्षा
यावर्षी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकसाठी 3 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातून नाफेड दीड लाख टन तर एनसीसीएफकडून दीड लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे. अजून तरी नाफेड एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली नाही.
शेतकरी सरकारी कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळणारा सरासरी 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल हा निचांकी दर असून शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना