नाशिक : जिल्ह्यातील उमराणे कांदा बाजारात Umrane Kanda Market) मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात सर्वोच्च २ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र, दुय्यम प्रतीच्या कांद्यांना फारशी मागणी नसल्याने (Kanda rate) त्यांचे दर एक हजार ते १ हजार चारशे रुपयांपर्यतच आहेत. त्यामुळे सर्वोच्च व सरासरी दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याने बघावयास मिळाले.
मागील वर्षी दिवाळीनंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे उन्हाळी कांदा लागवडीसाठी (Unhal Kanda Market) टाकलेली रोपे खराब झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत कांदा लागवड (Kanda Lagvad) करावी लागली होती. परिणामी आपसुकच हा कांदा दोन टप्प्यांत काढणीला आला होता. पहिल्या टप्प्यातील निघालेला कांद्यांना सुरुवातीला दर मिळत नसल्याने आगामी काळात बाजारभाव वाढतील, या अपेक्षेने बहुतांशी शेतकऱ्यांनी हा कांदा चाळींमध्ये साठवणूक केला होता.
तर दुसऱ्या टप्प्यातील कांद्यांना करपा (बुरशी) रोगाने ग्रासले असतानाच कांदा काढण्यासाठी मजूर टंचाईचा फटका, तसेच मागील महिन्यात चाललेल्या बेमोसमी पावसाचा फटका बसल्याने या कांद्याची प्रतवारी घसरली होती. परिणामी या कांद्याला बाजारात मागणी घटल्याने त्यांच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
दुसरीकडे बहुतांशी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून बी बियाणे, रासायनिक खते आदींसाठी चाळीतील कांदा विक्रीसाठी काढण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सर्वोच्च १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असलेल्या कांद्याना मागील आठवड्याच्या शेवटी शुक्रवार रोजी सुमारे पाचशे रुपयांची वाढ होत सर्वोच्च असा २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
सद्यःस्थितीत बाजार समित्यांमध्ये दिवसभरात कांद्याला मिळालेला सर्वोच्च बाजारभाव व झालेली आवक यांची माहीती सोशल मीडियावर टाकली जाते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या बाजार समितीत कांद्याला काय बाजारभाव मिळाला, याची माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारावर बहुतांश शेतकरी कांदा विक्रीचा निर्णय घेतात. मात्र, लिलावाप्रसंगी उच्च प्रतीच्या कांदा दरात व दुय्यम प्रतीच्या कांदा दरात सुमारे ५०० ते ७०० रुपयांची तफावत होत असल्याने भाववाढीबाबत बहुतांश शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे.