नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने नवीन लाल (पावसाळी) कांदा विक्रीसाठी येऊ लागला असून, खारी फाटा येथील रामेश्वर कृषी या खासगी मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे. आवक वाढताच खरेदीदारांकडून मागणी वाढल्याने उच्च प्रतीच्या लाल कांद्याला शुक्रवारी रोजी सर्वोच्च असा ३ हजार ८०० प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
चालू वर्षी जून-जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लाल कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे खराब होऊन कांदा लागवडीवर यांचा विपरीत परिणाम झाला होता. परिणामी दसऱ्यापासून विक्रीस येणाऱ्या लाल कांद्याची काढणी लांबणीवर पडली होती.
त्यामुळे ही आवक दिवाळीनंतर सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऐन काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच आठवडाभर झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी दिवाळीनंतरही लाल कांदा बाजारात विक्रीस आला नाही.
शुक्रवारी १५० वाहने दाखल
शुक्रवारी बाजार आवारात लाल कांद्याची सुमारे १५० वाहनांमधून दीड ते दोन हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. त्यांचे दर किमान १०० रुपये, कमाल ३८०० रुपये, तर सरासरी १००० रुपयांपर्यंत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे कांद्याच्या प्रतवारीत कमालीची घसरण झाली असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत.
