नाशिक : बाजार समित्यांकडून दररोज कांद्याला मिळणारे (Kanda Bajarbhav) दर हे किमान, कमाल व सरासरी या स्वरुपात असतात. परंतु, आवकेपैकी जास्तीत जास्त कांदा कोणत्या भावात खरेदी केला जातो वा उच्चांकी दर किती मिळाला, याचा मागमूस न करता केवळ सर्वोच्च भावाचा बोलबाला अधिक करून कांद्याच्या उच्चांकी भावाचा पराचा कावळा केला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वास्तवात आवकेच्या तुलनेत अवघ्या ०.१३ टक्के कांद्याला उच्चांकी, तर तब्बल ९८ टक्के कांद्याला सरासरी (Kanda Market) दर मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे.
शेतमालाच्या बाजारभावाचा (Onion Market Rate) विचार करता तेजी कमी कालावधीसाठी, तर मंदी अधिक काळ असते. कांदाही त्याला अपवाद नाही. बारा महिन्यांत जेव्हा काही काळ कांद्याला तेजी असते, त्या काळात दिवसागणिक बाजार समित्यांच्या आवारात घोषित होणाऱ्या उच्चांकी बाजारभावाची चर्चा सर्वदूर पसरते. त्यामुळे सरकारला खडबडून जागे होत कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातबंदी, निर्यात शुल्क आकारणी, आयातीला अनुदान तत्सम उपाययोजना करते. त्याच्या उलट जेव्हा बाजार समित्यांच्या आवारात कांदा गडगड़ती, कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चाचा, जोखमीचा मेळ बसत नाही, शेतकरी हवालदिल होत रस्त्यावर येतो, लिलाव बंद पाडतो तेव्हा सरकार याकडे दुर्लक्ष करते.
किरकोळ बाजारातही कमाल दराचा बोलबाला..
बाजार समित्यांतील घाऊक बाजारातील उच्चांकी दराचा, माध्यमातील चर्चेचा दाखला देऊन तत्कालीन स्थितीत कमाल भावाचा बोलबाला होत राहून महानगरात किरकोळ विक्रीवर या कमाल दराचा प्रभाव असतो. यात शेतकऱ्याचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नाही. तिकडे सामान्य ग्राहकाला मात्र चढ्या भावाने खरेदी करावी लागतो, असे चित्र बऱ्याचदा पाहायला मिळते.
सरासरी दराचा विचार व्हावा...
कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीतील प्रातिनिधिक आकडेवारी पाहता दैनंदिन आवकेच्या तुलनेत जाहीर होणाऱ्या उच्चांकी दराचा लाभ फक्त ०.१३ टक्के कांद्याला होतो, तर १८ टक्के कांद्याला सरासरी (साधारण) दर मिळत असल्याचे दिसते. सरासरी दर कसा काढला जातो हा एक शोधाचा विषय आहे. उच्चांकी व सरासरी दरात तब्बल एक ते दोन हजारांची तफावत असते. त्यामुळे सरकार वा व्यवस्थेने उच्चांकी भावाचा पराचा कावळा करण्यापेक्षा सरासरी दराचा अधिक विचार व्हायला हवा.
कांद्याच्या बाजारभावातील सरासरी व जास्तीचा यात हजार- दोन हजारांची तफावत ही फार होते. कांद्याच्या साइजमध्ये थोडाफार फरक असला तरी त्याचे टर्ले सोडले तर सर्व भाग उपयोगात येतो. त्यामुळे चार- पाचशेची तफावत ठीक आहे. यातून सरकारची दिशाभूल व शेतकऱ्यांची फसवणूक टळेल.
- संदीप जाधव, शेतकरी जोपूळ
दररोजचे कांद्याचे बाजारभाव दाखवताना किमान, कमाल व सरासरी दाखवले जातात, परंतु यात सर्वोच्च भाव हा एखाद्या नगाला दिला जातो. सर्वाधिक कांदा हा सरासरी भावातच खरेदी केला जातो. जास्तीचा भाव पाहून शेतकरी पळापळ करतो. देशावर त्याचीच चर्चा होते. पण खर काय ते पुढे यायला हवे.
- शिवाजी जाधव, शेतकरी, साळसाणे