लासलगाव : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून दर कोसळले आहेत. देशात कांदा दर ठरवणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी १०५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय मागणीत घट आणि निर्यातीत झालेली मोठी घसरण यामुळे देशातील घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाली आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे जाणारी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. परिणामी, निर्यात मंदावल्याने देशातील बाजारपेठेत कांद्याचा साठा वाढला आहे आणि घाऊक बाजारात दर घसरले आहेत.
अनेक ठिकाणी घाऊक दर उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही ठिकाणी कांदा अत्यल्प दरात विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. नगदी पीक असल्याने सगळे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. निर्यातदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे एच पी इ एचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी स्पष्ट केले.
दर घसरण्याची कारणे
मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्यात ठप्प होणे, देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर कांद्याचा पुरवठा, वाहतूक व आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे ही कारणे दर घसरण्याची आहे. घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. अनेक ठिकाणी दर उत्पादन खर्चाच्या खाली गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही. अनेक ठिकाणी कांदा कमी दरात विकावा लागत आहे.
मागील सात वर्षांतील कांदा निर्यात आकडेवारी
- २०१८-१९ - २१.८३ लाख टन (निर्यात) - ३४६८ कोटी (परकीय चलन)
- २०१९-२० - ११.४९ लाख टन - २३४० कोटी
- २०२०-२१ - १५.७७ लाख टन - २८२६ कोटी
- २०२१-२२ - १५.३७ लाख टन - ३४३२ कोटी
- २०२२-२३ - २५.२५ लाख टन - ४५२२ कोटी
- २०२३-२४ - १७.१७ लाख टन - ३९२२ कोटी
- २०२४-२५ - ११.४७ लाख टन - ३८२२ कोटी
- २०२५-२६ जाने. पर्यंत - १२.८३ लाख टन - २९७० कोटी
ऑनलाईन लाईट बिल भरा, वीजबिलावर अतिरिक्त सवलत मिळवा, महावितरणकडून खास ऑफर
