यवतमाळ : कापूसबाजारात सध्या मोठी तेजी पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. (Cotton Market)
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, युद्धजन्य परिस्थिती आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (Cotton Market)
राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला तब्बल ९,९५० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला असून हा यंदाच्या हंगामातील सर्वोच्च दर मानला जात आहे.(Cotton Market)
गत आठ दिवसांत कापसाच्या दरात तब्बल १,००० रुपये प्रति क्विंटलची वाढ नोंदवली गेली आहे. काही दिवसांपूर्वी सरासरी ८,००० रुपये दराने विकला जाणारा कापूस आता ९,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा थेट परिणाम
सध्या जागतिक बाजारात पॉलिस्टर फायबर महाग होत असल्याने सुती धागा आणि कापसाची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतीमुळेही कापूस बाजाराला आधार मिळत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम कृषी बाजारावर होत असल्याचे जाणकार सांगत आहेत.
पूर्वी जागतिक बाजारात कापसाला ७२ ते ७४ सेंट प्रति पाऊंड दर मिळत होता. आता हा दर वाढून ९० ते ९२ सेंट प्रति पाऊंडपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कापूस गाठीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. ४५ हजार रुपये असलेली कापसाची खंडी आता थेट ६२ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
'या' बाजारात मिळाला सर्वाधिक दर
बुधवारी यवतमाळ बाजारात कापसाला ८,००० रु. ते ९,१०० रु. दर मिळाला. तर राळेगाव आणि हिंगणघाट बाजार समित्यांमध्ये कापसाने थेट ९,९५० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
दर वाढले; पण शेतकऱ्यांकडे मालच नाही!
दरात मोठी वाढ होत असली तरी अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विकून टाकल्याने सध्या बाजारात मालाची कमतरता जाणवत आहे.
राळेगाव बाजार समितीत बुधवारी केवळ २५० क्विंटल कापसाची आवक झाली. त्यामुळे पुढील काही दिवसांत आवक वाढल्यास दर आणखी मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकीच्या दरात मात्र घसरण
कापसाच्या दरात तेजी असताना सरकीच्या दरात मात्र घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी ४,५०० रुपये प्रति क्विंटल असलेली सरकी आता ४,३०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
मात्र, रुई आणि सुताच्या वाढत्या मागणीमुळे कापसाला चांगला आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जागतिक बाजारातील वेगवान घडामोडी आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुढील काळातही बाजारातील स्थिती महत्त्वाची ठरणार आहे.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?
